शिवलीलामृत अध्याय सहावा | Shivlilamrut Adhyay 6: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा स्तोत्र online वाचायला मिळेल.
Shivlilamrut Adhyay 6 | शिवलीलामृत अध्याय सहावा
॥ श्री गणेशाय नमः ॥
जय जय मदनांतका मनमोहना । मदमत्सरकाननदहना ।
हे भवभयपाशनिकृंतना । भवानीरंजना भयहारका ॥ १ ॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा । सिंधुरवदनजनका कर्पूरगौरा ।
पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ २ ॥
नीलग्रीवा सुहास्यवदना । नंदीवहना अंधकमर्दना ।
गजातका दक्षक्रतुदलना । दानवदमना दयानिधे ॥ ३ ॥
अमितभक्तप्रियकरा । ताटिकांतकपूज्य त्रितापहरा ।
तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा । शक्ति नव्हेचि सर्वथा ॥ ४ ॥
नित्य शांत निर्विकल्प निरंजना । आशापाशरहित विरक्त पूर्णा ।
निजभक्तपाशविमोचना । जन्ममरणां मोचक जो ॥ ५ ॥
जे विषयकामनायुक्त । तुज स्वामी अनन्य भजत ।
त्यासी पुरविसी विषयपदार्थ । जे जे इच्छित सर्वही ॥ ६ ॥
सकामासी कामना पुरवून । तू निजध्यानी लाविसी मन ।
तेच परम विरक्त होऊन । पद निर्वाण पावती ॥ ७ ॥
सोमवार शिवरात्रि प्रदोष । आचरता तरले असंख्य स्त्रीपुरुष ।
येचविषयी कथा निर्दोष । सूत सांगे शौनकादिका ॥ ८ ॥
आर्यावर्त देश पवित्र । तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर ।
जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र । तैसा पुण्यशील प्रतापी ॥ ९ ॥
जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ । तैसा गोविप्रपाळक नृपाळ ।
दुष्ट दुर्जन शत्रु खळ । त्यासी काळ दंडावया ॥ १० ॥
प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ । बळास उपमिजे वायुसुत ।
समरभूमीस भार्गव अजित । विरोचनात्मज दानाविषयी ॥ ११ ॥
शिव आणि श्रीधर । त्यांच्या भक्तीस तत्पर ।
त्यास झाले बहुत पुत्र । पितयातुल्य प्रतापी ॥ १२ ॥
बहुत नवस करिता पंचवदना । एक कन्या झाली शुभानना ।
सुलोचना नैषधअंगना । उपमेस तिच्या न पुरती ॥ १३ ॥
तारकारिजनकशत्रुप्रिया । वृत्रारिशत्रुजनकजाया ।
उपमा देता द्विजराजभार्या । बहुत वाटती हळुवट ॥ १४ ॥
ते अपर प्रतिमा भार्गवीची । उपमा साजे हैमवतीची ।
की दूहिणजाया पुत्री मित्राची । उपमा साच द्यावी तीते ॥ १५ ॥
कलंकरहित रोहिणीधव । तैसा मुखशशी अभिनव ।
त्रैलोक्यसौंदर्य गाळूनि सर्व । ओतिली वाटे कमलोद्भवे ॥ १६ ॥
तिच्या जन्मकाळी द्विज सर्व । जातक वर्णिती अभिनव ।
चित्रवर्मा रायासी अपूर्व । सुख वाटले बहुतचि ॥ १७ ॥
एक द्विज बोले सत्य वाणी । ही होईल पृथ्वीची स्वामिणी ।
दहा सहस्र वर्षे कामिनी । राज्य करील अवनीचे ॥ १८ ॥
ऐकता तोषला राव बहुत । द्विजांस धन वस्त्र अलंकार देत ।
ज्याणे जे मागितले ते पुरवीत । नाही नेदी न म्हणेचि ॥ १९ ॥
तिचे नाम सीमंतिनी । सीमा स्वरूपाची झाली तेथूनी ।
लावण्य गंगा चातुर्यखाणी । शारदेऐसी जाणिजे ॥ २० ॥
राव संतोषे कोंदला बहुत । तो अमृतात विषबिंदु पडत ।
तैसा एक पंडित । भविष्यार्थ बोलिला ॥ २१ ॥
चौदावे वर्षी सीमंतिनीसी । वैधव्य येईल निश्चयेसी ।
ऐसे ऐकता राव मानसी । उद्विग्न बहुत जाहला ॥ २२ ॥
वाटे वज्र पडिले अंगावरी । की सौदामिनी कोसळली शिरी ।
किंवा काळजी घातली सुरी । तैसे झाले रायासी ॥ २३ ॥
पुढती बोले तो ब्राह्मण । राया शिवदयेकरून ।
होईल सौभाग्यवर्धन । सत्य सत्य त्रिवाचा ॥ २४ ॥
विप्र सदना गेले सवेग । रायासी लागला चिंतारोग ।
तव ती शुभांगी उद्वेग । रहित उपवर जाहली ॥ २५ ॥
सकळकळाप्रवीण । चातुर्यखाणीचे दिव्यरत्न ।
तिचे ऐकता सुस्वर गायन । धरिती मौन कोकिळा ॥ २६ ॥
अंगीचा सुवास पाहून । कस्तूरीमृग घेती रान ।
पितयास आवडे प्राणाहून । पाहता नयन न धाती ॥ २७ ॥
वदन पाहूनि रतिपति लज्जित । कटी देखोनि हरि वदन न दाखवीत ।
गमन देखोनि लपत । मराळ मानससरोवरी ॥ २८ ॥
क्षण एक चाले गजगती । देखोनि शंकला करिपती ।
कुरळ केश देखोनि भ्रमरपंक्ती । रुंजी घालिती सुवासा ॥ २९ ॥
कमळ मृग मीन खंजन । लजित देखोनि जिचे नयन ।
वेणीची आकृती पाहून । भुजंग विवरी दडाले ॥ ३० ॥
या वृक्षावरून त्या वृक्षी देख । शुक पळती पाहता नासिक ।
बिंबफळे अतिसुरेख । लज्जित अधर देखता ॥ ३१ ॥
पक्वदाडिंबबीज सुरंग बहुत । त्यांस लाजविती जिचे दंत ।
कुच देखोनि कमंडलु शंकित । स्वरूप अद्भुत वर्णं किती ॥३२॥
तनूचा सुवास अत्यंत । जाय दशयोजनपर्यंत ।
सूर्यप्रभेसम कांति भासत । शशिसम मनोरमा ॥ ३३ ॥
झाली असता उपवर । तिच्या पद्मिणी सख्या सुंदर ।
किन्नरकन्या मनोहर । गायन करिती तिजपासी ॥ ३४ ॥
त्यांच्या मुखेकरोनी । वार्ता ऐके सीमंतिनी ।
चतुर्दशवर्षी आपणालागुनी । वैधव्य कथिले ऋषीने ॥ ३५ ॥
परम संताप पावली ते समयी । याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी ।
तिचे पाय धरूनि लवलाही । पुसे सद्गद होवोनिया ॥ ३६ ॥
सौभाग्यवर्धनव्रत । माये कोणते सांग त्वरित ।
कोणते पुजू दैवत । कोणत्या गुरूसी शरण जाऊ ॥ ३७ ॥
सांगितला सकळ वृत्तांत । चौदावे वर्षी वैधव्य यथार्थ ।
मग मैत्रेयी बोलत । धरी व्रत सोमवार ॥ ३८ ॥
सांगे शिवमंत्र पंचाक्षरी । तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी ।
निशी झालिया पूजावा त्रिपुरारी । षोडशोपचारे सप्रेम ॥ ३९ ॥
म्हणे तुज दुःख झाले जरी प्राप्त । तरी न सोडी हे व्रत ।
ब्राह्मणभोजन दंपत्य बहत । पूजी माये अत्यादरे ॥ ४० ॥
पडिले दु:खाचे पर्वत । तरी टाकू नको हे व्रत ।
उबग न धरी मनात । बोल न ठेवी व्रताते ॥ ४१ ॥
त्यावरी नैषधराज नळ जाण । त्याचा पुत्र इंद्रसेन ।
त्याचा तनय चित्रांगद सुजाण । केवळ मदन दुसरा ॥ ४२ ॥
चतुःषष्टिकळायुक्त । जैसा पितामह नळ विख्यात ।
सर्वलक्षणी दिसे मंडित । चित्रांगद तैसाचि ॥ ४३ ॥
कुंभिनी शोधिली समग्र । परी त्याहूनि नाही सुंदर ।
तो तीस योजिला वर । राशि नक्षत्र पाहूनि ॥ ४४ ॥
इकडे सीमंतिनी आचरे व्रत । सांगितल्याहूनि विशेष करीत ।
आठ दिवसा अकरा शत । दंपत्ये पूजीत वस्त्रालंकारे ॥ ४५ ॥
आणीकही ब्राह्मण भोजन । आल्या अतिथा देत अन्न ।
सांग करी शिवपूजन । जागरण सोमवारनिशी ॥ ४६ ॥
पंचसूत्री शिवलिंग । मणिमय शिवसदन सुरंग ।
कोणी एक न्यून प्रसंग । न घडे सीमंतिनीपासूनी ॥ ४७ ॥
शिव अभिषेकिता पापसंहार । शिवपूजने साम्राज्य अपार ।
गंधाक्षता माला परिकर । सौभाग्यवर्धन त्याकरिता ॥ ४८ ॥
शिवापुढे धूप जाळिता बहुवस । तेणे आंग होय सुवास ।
दीप चालविता वंश । वर्धमान होय पै ॥ ४९ ॥
आणिकही दीपाचा गुण । कांति विशेष आयुष्यवर्धन ।
नैवेद्ये भाग्य पूर्ण । वर्धमान लक्ष्मी होय ॥ ५० ॥
तांबूलदाने यथार्थ । सिद्ध चारी पुरुषार्थ ।
नमस्कारे आरोग्य होत । प्रदक्षिणे भ्रम नासे ॥ ५१ ॥
जपे साधे महासिद्धि । होमहवने होय कोशवृद्धी ।
कीर्तन करिता कृपानिधी । सांब ठाके पुढे उभा ॥ ५२ ॥
ध्याने होय महाज्ञान । श्रवणे आधिव्याधिहरण ।
नृत्य करिता जन्ममरण । धूर्जटी दूर करीतसे ॥ ५३ ॥
तंत वितंत घन सुस्वर । शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र ।
तेणे कंठ सुरस कीर्ति अपार । रत्नदाने नेत्र दिव्य होती ॥ ५४ ॥
एवं सर्व अलंकार वाहता । सर्वा ठायी जयलाभ तत्त्वता ।
ब्राह्मणभोजन करिता । वर्णिले सर्व प्राप्त होय ॥ ५५ ॥
मैत्रेयीने पूर्वी व्रत । सीमंतिनीसी सांगितले समस्त ।
त्याहूनि ते विशेष आचरत । शिव पूजित आदरे ॥ ५६ ॥
त्यावरी नैषधाचा पौत्र । चित्रांगद नामे गुणगंभीर ।
त्यासी आणोनिया सादर । सीमंतिनी दीधली ॥ ५७ ॥
चारी दिवसपर्यंत । सोहळा झाला जो अद्भुत ।
तो वर्णिता ग्रंथ यथार्थ । पसरेल समुद्राऐसा ॥ ५८ ॥
सहस्र अर्बुदे धन जाणा । राये दिधली वरदक्षिणा ।
वस्त्र अलंकार नवरत्ना । गणना कोणा न करवे ॥ ५९ ॥
अश्वशाळा गजशाळा । रत्नखचित याने विशाळा ।
चित्रशाळा नृत्यशाळा । आंदण दिधले जामाता ॥ ६० ॥
चारी दिवसपर्यंत । चारी वर्ण केले तृप्त ।
विप्रा दक्षिणा दिली अपरिमित । नेता द्विज कंटाळती ॥ ६१ ॥
आश्रमा धन नेता ब्राह्मण । वाटेस टाकिती न नेववे म्हणून ।
याचका मुखी हेचि वचन । पुरे पुरे किती न्यावे ॥ ६२ ॥
रायाचा औदार्यकृशान । दारिद्र्यरान टाकीले जाळून ।
दुराशा दुष्कंटकवन । दग्ध झाले मुळीहुनी ॥ ६३ ॥
धनमेघ वर्षता अपार । दारिद्र्यधुरोळा बैसला समग्र ।
याचक तृप्तितृणांकुर । टवटवीत विरूढले ॥ ६४ ॥
असो नैषधपुरीचे जन । पाहती सीमंतिनीचे वदन ।
इंदुकळा षोडश चिरून । द्विज ओतिले बत्तीस ॥ ६५ ॥
कलंक काढूनी निःशेष । द्विजसंधी भरल्या राजस ।
मुखीचे निघता श्वासोच्छ्वास । सुगंधराज तोचि वाटे ॥ ६६ ॥
जलजमुखी जलजकंठ । जलजमाला तेज वरिष्ठ ।
जलजनिंबपत्रे करूनि एकवट । ओवाळून टाकिती शशिमुखा ॥ ६७ ॥
असो साडे झालिया पूर्ण । नैषधदेशा गेला इंद्रसेन ।
सकळ वर्हाडी अनुदिन । सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे ॥ ६८ ॥
विजयादशमी दीपावळी लक्षून । जामात राहविला मानेकरून ।
कितीएक दिवस घेतला ठेवून । चित्रवर्मा राजेंद्रे ॥ ६९ ॥
जैसा श्रीरंग आणि इंदिरा । तैसा जोडा दिसे साजिरा ।
नाना उपचार वधूवरा । समयोचित करी बहु ॥ ७० ॥
कोणे एके दिवसी चित्रांगद । सवे घेऊनि सेवकवृंद ।
धुरंधर सेना अगाध । जात मृगये लागूनी ॥ ७१ ॥
वनी खेळता श्रमला फार । घर्म आला तप्त शरीर ।
जाणोनि नौका सुंदर । यमुनाडोही घातली ॥ ७२ ॥
त्यात मुख्य सेवक घेऊन । बैसला चित्रांगद गुणनिधान ।
आवले अवलोकिती चहुकडून । कौतुके भाषण करिताती ॥ ७३ ॥
कृतांत भगिनीचे उदक । कृष्णवर्ण भयानक ।
त्या उदकाचा अंत सम्यक । कधी कोणी न घेतला ॥ ७४ ॥
तो प्रभंजन सुटला अद्भुत । नौका तेथे डळमळीत ।
आवले आक्रोशे बोलत । नौका बुडाली म्हणोनिया ॥ ७५ ॥
भयभीत झाले समस्त । नौका बुडाली अकस्मात ।
एकचि वर्तला आकांत । नाही अंत महाशब्दा ॥ ७६ ॥
तीरी सेना होती अपार । तिच्या दु:खासी नाही पार ।
चित्रांगदाचे पाठीराखे वीर । आकांत करिती एकसरे ॥ ७७ ॥
सेवक धावती हाक फोडीत । चित्रवर्यासी जाणविती मात ।
राव वक्षःस्थळ बडवीत । चरणी धावत यमुनातीरी ॥ ७८ ॥
शिबिकेमाजी बैसोनी । मातेसमवेत सीमंतिनी ।
धावत आली तेच क्षणी । पडती धरणी सर्वही ॥ ९ ॥
दुखार्णवी पडली एकसरी । तेथे कोणासी कोण सावरी ।
सीमंतिनी पडली अवनीवरी । पिता सावरी तियेसी ॥ ८० ॥
माता धावोनि उठाउठी । कन्येच्या गळा घाली मिठी ।
शोक करी तेणे सृष्टी । आकांत एकचि वर्तला ॥ ८१ ॥
सीमंतिनीचा शोक ऐकोनी । डळमळू लागली कुंभिनी ।
मेदिनीवसनाचे पाणी । तप्त झाले एकसरे ॥ ८२ ॥
पशु पक्षी वनचरे समस्त । वृक्ष गुल्म लता पर्वत ।
त्यासही शोक अत्यंत । सीमंतिनीसी पाहता ॥ ८३ ॥
शोके मूर्च्छना येऊनि । निचेष्टित पडली सीमंतिनी ।
तो इंद्रसेनासहित गृहिणी । आली वार्ता ऐकोनिया ॥ ८४ ॥
अवघी झाली एकत्र । दुखार्णवाचा न लागे पार ।
स्नुषेते देखोनि श्वशुर । शोकाग्नीने कवळिला ॥ ८५ ॥
चित्रांगदाची माता पडली क्षिती । तिचे नाम लावण्यवती ।
सकळ स्त्रिया सावरिती । नाही मिती शोकासी ॥ ८६ ॥
मृत्तिका घेवोनि हस्तकी । लावण्यवती घाली मुखी ।
म्हणे गहन पूर्वकर्म की । शोक झाला यथार्थ ॥ ८७ ॥
माझा एकुलता एक बाळ । चित्रांगद परम स्नेहाळ ।
पूर्वपापाचे हे फळ । कालिंदी काळ झाली आम्हा ॥ ८८ ॥
माझी अंधाची काठी पाही । कोणे बुडविली यमुनाडोही ।
मज अनाथाची गाठी पाही । कोणे सोडिली निर्दये ॥ ८९ ॥
माझा दावा गे राजहंस । कोणे नेले गे माझे पाडस ।
माझा चित्रांगद डोळस । कोणे चोरून नेला गे ॥ ९० ॥
म्हणे म्या पूर्वी काय केले । प्रदोषव्रत मध्येच टाकिले ।
की शिवरात्रीस अन्न घेतले । की व्रत मोडिले सोमवार ॥ ९१ ॥
की रमाधव उमाधव । यात केला भेदभाव ।
की हरिहरकीर्तनगौरव । कथारंग उच्छेदिला ॥ ९२ ॥
की पंक्तिभेद केला निःशेष । की संतमहंता लाविला दोष ।
की परधनाचा अभिलाष । केला पूर्वी म्या वाटे ॥ ९३ ॥
की दान देते म्हणवून । ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन ।
की दाता देता दान । केले विघ्न म्या पूर्वी ॥ ९४ ॥
कोणाच्या मुखीचा घास काढिला । की गुरुद्रोह पूर्वी मज घडला ।
की पात्री ब्राह्मण बैसला । तो बाहेर घातला उठवूनी ॥ ९५ ॥
की कुरंगीपाडसा विघडविले । की परिव्राजकाप्रती निंदिले ।
तरी ऐसे निधान गेले । त्याच दोषास्तव वाटे ॥ ९६ ॥
असो प्रधानवर्गी सावरूनी । सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी ।
स्वनगरासी नेवोनी । निजसदनी राहविली ॥ ९७ ॥
इंद्रसेन लावण्यवती । शोके संतप्त नगरा जाती ।
तव दायाद येऊनि पापमती । राज्य सर्व घेतले ॥ ९८ ॥
मग इंद्रसेन लावण्यवती । देशांतरा पळोनि जाती ।
तेथोनिही शत्रु धरूनि आणिती । बंदी घालिती दृढ तेव्हा ॥ ९९ ॥
इकडे सीमंतिनी व्रत । न सोडी अत्यादरे करीत ।
एकादशशत दंपत्य । पूजी संयुक्त विधीने ॥ १०० ॥
सर्वही भोग वर्जून जाण । यामिनीदिनी नित्य करी शिवस्मरण ।
तीन वर्षे झाली पूर्ण । यावरी वर्तमान ऐका पुढे ॥ १०१ ॥
इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला । नागकन्यांनी पाताळी नेला ।
नागभुवनीची पाहता लीला । तटस्थ झाला राजपुत्र ॥ १०२ ॥
दिव्य नारी देखिल्या नागिणी । पद्मिनी हस्तिनी चित्रिणी ।
शंखिनी अतिचतुर भामिनी । सुवास अंगी ज्यांचिया ॥ १०३ ॥
ज्यांच्या पदनखी निरंतर । गुंजारव करिती भ्रमर ।
ज्याचा देखता वदनचंद्र । तपस्वीचकोर वेधले ॥ १०४ ॥
नवरत्नांचे खडे । पसरले तेथे चहूकडे ।
स्वर्गसुखाहूनि आवडे । पाताळभुवन पाहता ॥ १०५ ॥
तक्षक नागराज प्रसिद्ध । त्यापुढे उभा केला चित्रांगद ।
साष्टांग नमित सद्गद । होवोनि स्तुति करीतसे ॥ १०६ ॥
निर्भय तेथे राजसुत । तक्षक वर्तमान पुसत ।
जे जे वर्तले समस्त । केले श्रुत चित्रांगदे ॥ १०७ ॥
मागुती नागराज झाला । तुम्ही कोण्या दैवतासी भजता ।
यावरी शिवमहिमा तत्त्वता । झाला वर्णिता चित्रांगद ॥ १०८ ॥
प्रकृतिपुरुष दोघेजणे । निर्मिली इच्छामात्रे जेणे ।
अनंत ब्रह्मांडे प्रीतीने । रचियेली हेळामात्रे ॥ १०९ ॥
इच्छा परतता जाण । अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून ।
प्रकृतिपुरुषात होती लीन । पंचभूते तत्त्वांसहित ॥ ११० ॥
मग दोघे एकप्रीती । आदिपुरुषामाजी सामावती ।
तो सदाशिव निश्चिती । आम्ही भजतो तयाते ॥ १११ ॥
ज्याच्या मायेपासून । झाले हे त्रिमूर्ति त्रिगुण ।
त्या सत्त्वांशेकरून । विष्णु जेणे निर्मिला ॥ ११२ ॥
रजांशे केले विरिंचीस । तमांशे रुद्र तामस ।
तो शिव पुराणपुरुष । आम्ही भजतो सर्वदा ॥ ११३ ॥
पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन । पंचतत्त्व सरिता मेदिनीवसन ।
भस्म लोष्ट अष्टधातु व्यापून । उरला तो शिव भजतो आम्ही ॥ ११४ ॥
अष्टादश वनस्पती सर्व बीजे । आकारा आली सहजे ।
व्यापिले जेणे कैलासराजे । त्याचे उपासक आम्ही असो ॥ ११५ ॥
ज्याचे नेत्र सूर्य जाण । रोहिणीवर ज्याचे मन ।
रमारमण ज्याचे अंतःकरण । बुद्धि द्रुहिण जयाची ॥ ११६ ॥
अहंकार ज्याचा रुद्र । पाणी जयाचे पुरंदर ।
कृतांत दाढा तीव्र । विराटपुरुष सर्वही जो ॥ ११७ ॥
एवं जितुके देवताचक्र । ते शिवाचे अवयव समग्र ।
एकादश रुद्र द्वादश मित्र । उभे त्यापुढे कर जोडूनी ॥ ११८ ॥
ऐसे ज्याचे गुण अपार । मी काय वर्ण मानव पामर ।
त्याच्या दासांचे दास किंकर । आम्ही असो कश्यपात्मजा ॥ ११९ ॥
ऐसे वचन ऐकूनि सतेज । परम संतोषला दंदशूकराज ।
क्षेमालिंगन देऊनि कद्रुतनुज । नाना कौतुके दाखवी तया ॥ १२० ॥
म्हणे देवास जे दुर्लभ वस्त । ते येथे आहे समस्त ।
तू मज आवडसी बहुत । राहावे स्वस्थ मजपासी ॥ १२१ ॥
चित्रांगद म्हणे महाराजा । शिवकर्णभूषणा सतेजा ।
जननीजनकांसी वेध माझा । एवढाच मी पोटी तयांच्या ॥ १२२ ॥
चौदा वर्षांची सीमंतिनी । गुणनिधान लावण्यखाणी ।
प्राण देईल ते नितंबिनी । बोलता नयनी अश्रु आले ॥ १२३ ॥
मातापितयांचे चरण । खंती वाटते कधी पाहीन ।
माझी माता मजविण कष्टी जाण । नेत्री प्राण उरला असे ॥ १२४ ॥
तरी मज घालवी नेऊन । म्हणोनि धरिले नागेंद्राचे चरण ।
तक्षक होऊन प्रसन्न । देत अपार वस्तूंते ॥ १२५ ॥
म्हणे द्वादशसहस्र नागांचे बळ । दिधले तुज होईल सुफळ ।
तैसाचि झाला तत्काळ । चित्रांगद वीर तो ॥ १२६ ॥
तू करशील जेव्हा स्मरण । तेव्हा तुज संकटी पावेन ।
मनोवेग वारू आणून । चिंतामणी सवे दिधला ॥ १२७ ॥
दुर्लभ रत्ने भूमंडळी । देत अमूल्य तेजागळी ।
पर्वताकार मोट बांधिली । शिरी दिधली राक्षसाच्या ॥ १२८ ॥
देत दिव्य वस्त्रे अलंकार । सवे एक दिधला फणिवर ।
मनोवेगे यमुनातीर । क्रमूनि बाहेर निघाला ॥ १२९ ॥
झाले तीन संवत्सर । चहूकडे पाहे राजपुत्र ।
तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर । कालिंदीतीरा पातली ॥ १३० ॥
एकाकडे एक पाहाती । आश्चर्य वाटे ओळख न देती ।
दिव्यरत्नमंडित नृपति । चित्रांगद दिसतसे ॥ १३१ ॥
फणिमस्तकीची मुक्ते सतेज विशेष । भुजेपर्यंत डोले अवतंस ।
गजमुक्तांच्या माळा राजस । गळा शोभती जयाच्या ॥ १३२ ॥
पाचू जडल्या कटिमेखलेवरी । तेणे हिरवी झाली धरित्री ।
मृगपशु धावती एकसरी । नवे तृण वाढले म्हणोनिया ॥ १३३ ॥
मुक्ताफळे देखोनि तेजाळ । धावतच येती मराळ ।
देखोनि आरक्त रत्नांचे ढाळ । कीर धावती भक्षावया ॥ १३४ ॥
अंगी दिव्य चंदनसुगंध । देखोनि धावती मिलिंद ।
दशदिशा व्यापल्या सुबुद्ध । घ्राणदेवता तृप्त होती ॥ १३५ ॥
विस्मित झाली सीमंतिनी । भ्रमचक्री पडली विचार मनी ।
चित्रांगदही तटस्थ होऊनी । क्षणक्षणां न्याहाळीत ॥ १३६ ॥
कंठभूषणे रहित मंगळसूत्र । हरिद्राकुंकुमविरहित वस्त्र ।
अंजनविवर्जित नेत्र । राजपुत्र पाहातसे ॥ १३७ ॥
न्याहाळता तटस्थ स्वरूपासी । वाटती रंभा उर्वशी दासी ।
कुचकमंडलु यांसी । उपमा नाही द्यावया ॥ १३८ ॥
तप्तचामीकरवर्ण डोळस । चिंताक्रांत अंग झाले कृश ।
की चंद्रकळा राजस । ग्रहणकाळी झाकोळती ॥ १३९ ॥
मग तियेपाशी येऊन । पुसे साक्षेप वर्तमान ।
म्हणे तू आहेस कोणाची कोण । मुळापासून सर्व सांग ॥ १४० ॥
मग आपुल्या जन्मापासून । सांगितले चरित्र संपूर्ण ।
बोलता आसुवे नयन । भरूनिया चालिले ॥ १४१ ॥
अश्रुधारा स्रवती खालत्या । लाविल्या पयोधरलिंगास गळत्या ।
दंत जियेचे बोलता । नक्षत्रांऐसे लखलखती ॥ १४२ ॥
सीमंतिनीच्या सख्या चतुर । राजपुत्रा सांगती समाचार ।
तीन वर्षे झाली हिचा भ्रतार । बुडाला येथे यमुनाजळी ॥ १४३ ॥
इची सासूश्वशुर दोनी । शत्रूंनी घातली बंदिखानी ।
हे शुभांगी लावण्यखाणी । ऐसी गती इयेची ॥ १४४ ॥
कंठ दाटला सद्गदित । चित्रांगद खाली पाहात ।
आरक्त रेखांकित नेत्र । वस्त्र पुसीत वेळोवेळा ॥ १४५ ॥
सीमंतिनी सख्यांस सांगे खूण । कोण कोठील पुसा वर्तमान ।
सख्या पुसती येणे कोठून । झाले खूण नाम सांगा ॥ १४६ ॥
तो म्हणे आम्ही सिद्धपुरुष । जातो चिंतिलिया ठायास ।
क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास । गमन आमुचे त्रिलोकी ॥ १४७ ॥
कळते भूतभविष्यवर्तमान । मग सीमंतिनीस हाती धरून ।
कानी सांगे अमृतवचन । भ्रतार तुझा जिवंत असे ॥ १४८ ॥
आजि तीन दिवसां भेटवीन । लटिके नव्हे कदापि जाण ।
श्रीसदाशिवाची आण । असत्य नव्हे कल्पांती ॥ १४९ ॥
सौभाग्यगंगे चातुर्यविलासिनी । तुझे ऐश्वर्य चढेल येथूनी ।
परी ही गोष्टी कोणालागूनि । दिवसत्रय प्रकटवू नको ॥ १५० ॥
ऐसे सांगोनि परमस्नेहे । येरी चोरदृष्टी मुख पाहे ।
म्हणे वाटते चित्रांगद होये । ऐसे काय घडू शके ॥ १५१ ॥
मृत्यु पावला तो येईल कैसा । मग आठवी भवानीमहेशा ।
करुणाकरा पुराणपुरुषा । न कळे लीला अगम्य तुझी ॥ १५२ ॥
हा परपुरुष जरी असता । तरी मज का हाती धरिता ।
स्नेह उपजला माझिया चित्ता । परम आप्त वाटतसे ॥ १५३ ॥
काय प्राशून आला अमृत । की काळे गिळोनि उगळिला सत्य ।
हे मदनांतक षडास्यतात । तुझे कर्तृत्व न कळे मज ॥ १५४ ॥
जगन्निवासा हे करशील सत्य । तरी अकरा लक्ष पूजीन दंपत्य ।
तितुक्याच वाती यथार्थ । बिल्वदळे अर्पिन ॥ १५५ ॥
यावरी बोले राजपुत्र । सुकुमारे सदनासी जाई सत्वर ।
तुझी सासू आणि श्वशुर । त्यांसी सांगू जातो आता ॥ १५६ ॥
तुमचा पुत्र येतो म्हणोन । शुभ समाचार त्यास सांगेन ।
येरी करून हास्यवदन । निजसदनाप्रती गेली ॥ १५७ ॥
सख्या बोलती आण वाहून । तुझा भ्रतार होय पूर्ण ।
ऐसा पुरुष आहे कोण । जो तुझा हात धरू शके ॥ १५८ ॥
तुझी वचने ऐकून । त्याच्या नेत्री आले जीवन ।
सीमंतिनी म्हणे वर्तमान । फोडू नका गे उग्या रहा ॥ १५९ ॥
सीमंतिनीच्या मुखकमळी । सौभाग्यकळा दिसू लागली ।
सुखासनारूढ सदना गेली । कोठे काही न बोले ॥ १६० ॥
मनोवेगाच्या वारूवरी त्वरित । आरूढला सीमंतिनीकांत ।
निजनगराबाहेर उपवनात । जाऊनिया उतरला ॥ १६१ ॥
नाग मनुष्यवेष धरून । शत्रूस सांगे वर्तमान ।
द्वादशसहस्र नागांचे बळ घेऊन । चित्रांगद आला असे ॥ १६२ ॥
तुम्ही कैसे वाचाल सत्य । तव ते समस्त झाले भयभीत ।
येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ । सिंहासनी स्थापा वेगी ॥ १६३ ॥
मग नाग जाऊन । मातापितयासी सांगे वर्तमान ।
त्यांसी आनंद झाला पूर्ण । त्रिभुवनात न समाये ॥ १६४ ॥
तो शत्रु होवोनि शरणागत । उभयतांसी सिंहासनी स्थापीत ।
दायाद कर जोडोनि समस्त । म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे ॥१६५ ॥
मग सर्व दळभार सिद्ध करून । भेटीस निघाला इंद्रसेन ।
वाद्यनादे संपूर्ण । भूमंडळ डळमळी ॥ १६६ ॥
माता पिता देखोन । सप्रेम धावे चित्रांगद सुजाण ।
धरूनि पितयाचे चरण । क्षेमालिंगनी मिसळला ॥ १६७ ॥
मग लावण्यवती धावत । चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत ।
जैसा कौसल्येसी रघुनाथ । चतुर्दश वर्षानंतरे ॥ १६८ ॥
हारपले रत्न सापडले । की जन्मांधासी नेत्र आले ।
की प्राण जाता पडले । मुखामाजी अमृत ॥ १६९ ॥
करभार घेऊन अमूप । धावती देशोदेशींचे भूप ।
पौरजनांचे भार समीप । येऊनिया भेटती ॥ १७० ॥
हनुमंते आणिला गिरिद्रोण । जेवी उठविला उर्मिलारमण ।
आनंदमय झाले त्रिभुवन । तैसेच पूर्ण पै झाले ॥ १७१ ॥
मातापितयांसमवेत । चित्रांगद चालिला मिरवत ।
नैषधपुर समस्त । श्रृंगारिले तेधवा ॥ १७२ ॥
चित्रवर्म्यासी सांगावया साचार । धावताती सेवकभार ।
महाद्वारी येता समाचार । मात फुटली चहूकडे ॥ १७३ ॥
चार जाऊनि रायास वंदित । उठा जी तुमचे आले जामात ।
राव गजबजिला धावत । नयनी लोटत आनंदाश्रु ॥ १७४ ॥
कंठ झाला सद्गदित । रोमांच अंगी उभे ठाकत ।
समाचार आणिला त्यासी आलिंगीत । धन वस्त्र देत सीमेहुनि ॥ १७५ ॥
अपार भरूनि रथ । शर्करा नगरात वाटीत ।
मंगळतुरे अद्भुत । वाजो लागली एकसरे ॥ १७६ ॥
धावले अपार भूसुर । राये कोश दाविले समग्र ।
आवडे तितुके धन न्यावे सत्वर । सुखासी पार नाही माझ्या ॥ १७७ ॥
जय जय शिव उमानाथ । म्हणोनि राव उडत नाचत ।
उपायने घेऊनि धावत । प्रजाजन नगरीचे ॥ १७८ ॥
सीमंतिनीसी बोलावून । दिव्य अलंकार लेववून ।
जयजयकार करून । मंगळसूत्र बांधिले ॥ १७९ ॥
दिव्य कुंकुम नेत्री अंजन । हरिद्रा सुमनहार चंदन ।
सौभाग्य लेवविती जाण । त्रयोदशगुणी विडे देती ॥ १८० ॥
एक शृंगार सांवरिती । एक पीकपात्र पुढे करिती ।
नगरीच्या नारी धावती । सीमंतिनीसी पाहावया ॥ १८१ ॥
माता धावली सद्गदित । सीमंतिनीसी हृदयी धरीत ।
माये तुझा सौभाग्यपर्वत । असंभाव्य उचंबळला ॥ १८२ ॥
ऐश्वर्यद्रुम गेला तुटून । पुढती विरूढला भेदीत गगन ।
तुझी सौभाग्यगंगा भरून । अक्षय चालिली उतरेना ॥ १८३ ॥
धन्य धन्य सोमवारव्रत । अकरा लक्ष पूजिली दंपत्य ।
जितवन करावयास जामात । बोलावू धाडिले त्वरेने ॥ १८४ ॥
मातापितयांसमवेत । चित्रांगद नगरा येत ।
चित्रवर्मा नृपती त्वरित । सामोरा येत तयासी ॥ १८५ ॥
जामाताच्या कंठी । धावोनि श्वशुरे घातली मिठी ।
ब्रह्मानंदे भरली सृष्टी । पुष्पवृष्टी करिती देव ॥ १८६ ॥
नगरामाजी आणिली मिरवत । पुनः विवाह केला अद्भुत ।
मग एकांती चित्रांगद नृपनाथ । बोलावीत सीमंतिनीसी ॥ १८७ ॥
पाताळीचे अलंकार अद्भुत । सीमंतिनीलागी लेववीत ।
नवरत्नप्रभा फाकली अमित । पाहता तटस्थ नारीनर ॥ १८८ ॥
पाताळीचा सुगंधराज निगुती । आत्महस्ते लेववी सीमंतिनीप्रती ।
नाना वस्तु अपूर्व क्षिती । श्वशुरालागी दीधल्या ॥ १८९ ॥
सासूश्वशुरांच्या चरणी । मस्तक ठेवी सीमंतिनी ।
माये तुझा सौभाग्योदधि उचंबळोनि । भरला असो बहु काळ ॥ १९० ॥
पुत्र सीमंतिनीसहित । इंद्रसेन नैषधपुरा जात ।
अवनीचे राजे मिळोनि समस्त । छत्र देत चित्रांगदा ॥ १९१ ॥
समस्त राज्यभार समर्पून । तपासी गेला इंद्रसेन ।
तेथे करूनिया शिवार्चन । शिवपदासी पावला ॥ १९२ ॥
आठ पुत्र पितयासमान । सीमंतिनीसी झाले जाण ।
दहा सहस्र वर्षे निर्विघ्न । राज्य केले नैषधपुरी ॥ १९३ ॥
जैसा पितामह नळराज । परमपुण्यश्लोक तेज:पुंज ।
तैसाच चित्रांगद भूभुज । न्यायनीती वर्ततसे ॥ १९४ ॥
शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । सीमंतिनी चढते करीत ।
तिची ख्याती अद्भुत । सूत सांगे शौनकादिका ॥ १९५ ॥
हे सीमंतिनी आख्यान सुरस । ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस ।
अंतरला भ्रतार बहुत दिवस । तो भेटेल परतोनी ॥ १९६ ॥
विगतधवा ऐकती । त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती ।
शिवचरणी धरावी प्रीती । सोमवारव्रत न सोडावे ॥ १९७ ॥
ऐसे ऐकता आख्यान । अंतरला पुत्र भेटेल मागुतेन ।
आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण । होय ज्ञान विद्या बहु ॥ ९८ ॥
गंडांतरे मृत्यु निरसोनि जाय । गतधन प्राप्त शत्रुपराजय ।
श्रवणे पठणे सर्व कार्य । पावे सिद्धी येणेचि ॥ १९९ ॥
सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण । भक्तिमाघमासी करिता स्नान ।
त्रिविध दोष जाती जळोन । शिवपद प्राप्त शेवटी ॥ २०० ॥
सीमंतिनी आख्यान सुधारस । प्राशन करिती संजनत्रिदश ।
निंदक असुर तामस । अहंकारमद्य सेविती ॥ २०१ ॥
अपर्णाहृदयारविंदमिलिंद । श्रीधरस्वामी पूर्ण ब्रह्मानंद ।
अभंग अक्षय अभेद । न चळे न ढळे कदाही ॥ २०२ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । षष्ठाध्याय गोड हा ॥ २०३ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
मित्रोंनो तुम्हाला शिवलीलामृत अध्याय सहावा | Shivlilamrut Adhyay 6 जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.
या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख त्वरितच अपडेट करू.