श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Charitra Saramrut Adhyay 1

Swami Charitra Saramrut Adhyay 1
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Charitra Saramrut Adhyay 1 हा online वाचायला मिळेल.

Swami Charitra Saramrut Adhyay 1 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥
जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥
जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥
जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥
मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय
॥४॥
विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती
॥५॥
रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष
॥६॥
वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी
॥७॥
नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै
॥८॥
जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान
॥९॥
भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे
॥१०॥
कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती
॥११॥
जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य
॥१२॥
ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले
॥१३॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू
॥१४॥
नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥
जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥
त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची
॥१७॥
जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू
॥१८॥
मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥
सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी
॥२०॥
तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे
॥२१॥
जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली
॥२२॥
मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी
॥२३॥
जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥
ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये
॥२५॥
तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग
॥२६॥
मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची
॥२७॥
नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी
॥२८॥
जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे
॥२९॥
ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला
॥३०॥
तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥
कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना
॥३२॥
चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो
॥३३॥
त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या
॥३४॥
वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू
॥३५॥
पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती
॥३६॥
शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली
॥३७॥
सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥
नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ
॥३९॥
धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य
॥४०॥
लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध
॥४१॥
मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे
॥४२॥
कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना
॥४३॥
ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले
॥४४॥
त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले
॥४५॥
तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो
॥४६॥
किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥
पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥
तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या
॥४९॥
कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची
॥५०॥
ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी
॥५१॥
उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये
॥५२॥
ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो
॥५३॥
आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती
॥५४॥
मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी
॥५५॥
व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥
कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥
श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥
ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे
॥५९॥
अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी
॥६०॥
आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले
॥६१॥
महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥
परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥
संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे
॥६४॥
परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥
न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे
॥६६॥
स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा
॥६७॥
त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा
॥६८॥
की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥
कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे
॥७०॥
अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥
आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि
॥७२॥
वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान
॥७३॥
यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे
॥७४॥
इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा
॥७५॥
श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


आशा करतो की तुम्हाला Swami Charitra Saramrut Adhyay 1 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here