श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा | Swami Charitra Saramrut Adhyay 14

Swami Charitra Saramrut Adhyay 14
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा | Swami Charitra Saramrut Adhyay 14 online वाचायला प्रस्तुत करत आहे.

Swami Charitra Saramrut Adhyay 14 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा

। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥
जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना । जयजयाजी परमपावना । दीनबंधा जगद़्गुरु ॥१॥
आपुल्या कृपे करोन । त्रयोदश अध्यायपर्यंत । वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे वदवावे ॥२॥
आपुल्या कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया । चरित्र ऐकोनी श्रोतया । संतोष होवो बहुसाळ ॥३॥
कैसी करावी आपुली भक्ती । हे नेणे मी मंदमती । परी प्रश्न करिता श्रोती । अल्पमती सांगतसे ॥४॥
प्रातःकाळी उठोन । आधी करावे नामस्मरण । अंतरी ध्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥५॥
प्रातःकर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी । भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त ॥६॥
एकाग्र करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान । सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसुमे अर्पावी ॥७॥
धूप-दीप-नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । अर्पावे नाना खाद्य । नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥८॥
षोडशोपचारे पूजन । करावे सद़्भावे करुन । धूप-दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥९॥

जोडोनिया दोन्ही कर । उभे रहावे समोर । मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र श्रेष्ठ पै ॥१०॥

आजानुबाहु सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान । भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥११॥
मग करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा । परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या ॥१२॥
जयजयाजी पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा । अनंत ब्रह्मांडधीशा । वेदवंद्या जगद़्गुरु ॥१३॥
सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया । भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१४॥

तू अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन । तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥१५॥

तू विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र । अष्टदिक्पालादि समग्र । तूच रुपे नटलासी ॥१६॥

कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता । दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१७॥
जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र । तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१८॥

असोनिया निर्गुण । रुपे नटलासी सगुण । ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१९॥

वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे । विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि ॥२०॥

मी केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती । सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती वर्णिता ॥२१॥
दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था । कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे ॥२२॥
आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना । कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे सदैव ॥२३॥
पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन । इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२४॥
दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर । त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ॥२५॥
आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना । भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ॥२६॥
किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन । अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै ॥२७॥
शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो । सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२८॥
भवदुःख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो । वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२९॥
सदा साधु-समागम । तुझे भजन उत्तम । तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥३०॥
व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्ता । अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ॥३१॥
आप्तवर्गाचे पोषण । न्याय मार्गावलंबन । इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ॥३२॥

असोनिया संसारात । प्राशीन तव ज्ञानामृत । प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥३३॥
ऐशी प्रार्थना करिता । आनंद होय समर्था । संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३४॥
गुरुवार उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन । प्रदोषसमय होता जाण । उपोषण सोडावे ॥३५॥
तेणे वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी । अनुभवाची प्रसिद्धि । करिताती स्वामीभक्त ॥३६॥

श्री स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र । प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ पाविजे ॥३७॥

ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी । स्त्रियांनीही निशिदिनी । जप याचा करावा ॥३८॥
प्रसंगी मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था । स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष जातील ॥३९॥
कैसी करावी स्वामीभक्ती । हे नेणे मी मंदगती । परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती श्रेष्ठ पै ॥४०॥
आम्ही आहो स्वामीभक्त । मिरवू नये लोकांत । जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ । निष्फळ भक्ती तयाची ॥४१॥
दंभे षोडशोपचारे । ते प्रिय नव्हेचि समर्था । बावे पत्र-पुष्प अर्पिता । समाधान स्वामीते ॥४२॥
जयजयाजी आनंदकंदा । जयजयाजी करुणासमुद्रा । विष्णू शंकराचिया छंदा । कृपा करोनी पुरवावे ॥४३॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥४४॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


तुम्हाला आमची web site आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना share नक्की करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here