श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा | Swami Charitra Saramrut Adhyay 15

Swami Charitra Saramrut Adhyay 15
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या blog मध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा | Swami Charitra Saramrut Adhyay 15 प्रस्तुत करत आहे.

Swami Charitra Saramrut Adhyay 15 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा

। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥
नलगे करणे तीर्थाटन । हठयोगादिक साधन । वेदाभ्यास शास्त्रज्ञान । मोक्षसाधनकारणे ॥१॥
अंतरी स्वामीभक्ती जडता । चारी पुरुषार्थ येती हाता । पाप ताप दैन्य वार्ता । तेथे काही नुरेची ॥२॥
वर्तत असता संसारी । स्वामीपद आठवी अंतरी । तयाते या भवसागरी । निश्चये तारिती समर्थ ॥३॥
सर्व कामना पुरवोन । अंती दाविती सुरभुवन । जे नर करिती नामस्मरण । ते मुक्त याच देही ॥४॥
मंगळवेढे ग्रामात । राहत असता श्रीसमर्थ । ग्रामवासी जन समस्त । वेडा म्हणती तयांसी ॥५॥
आपुली व्हावी प्रख्याती । हे नसेचि जयाच्या चित्ती । स्वेच्छे वर्तन करिती । काही न जाणती जनवार्ता ॥६॥
कोणासी भाषण न करिती । कवणाचे गृहा न जाती । दुष्टोत्तरे जन ताडिती । तरी क्रोध नयेची ॥७॥
शीतोष्णाची भीती । नसेची ज्यांचिया चित्ती । सदा अरण्यात वसती । एकान्तस्थळी समर्थ ॥८॥
सुखदुःख समान । सदा तृप्त असे मन । लोकवस्ती आणि वन । दोन्ही जया सारखी ॥९॥
परमेश्वररुप यती । ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती । ते करिता स्वामीभक्ती । जन हासती तयाते ॥१०॥
या वेळी मंगळवेढ्यात । बसप्पा तेली राहात । दारिद्रये पीडिला बहुत । दीन स्थिती तयाची ॥११॥
बसप्पा व्यवसाय करी । पुरे न पडे त्यामाझारी । अठराविश्वे दारिद्रय घरी । पोटा भाकरी मिळेना ॥१२॥
तो एके दिनी फिरत फिरत । सहज वनामाजी जात । तो देखिले श्रीसमर्थ । दिगंबर यतिराज ॥१३॥
कंटकशय्या करोन । तियेवरी केले शयन । ऐसे नवल देखोन । लोटांगण घालितसे ॥१४॥
अंतरी पटली खूण । यति ईश्वरांश पूर्ण । म्हणुनी सुखे शयन । कंटकशय्येवरी केले ॥१५॥
अष्टभावे दाटोनी । माथा ठेवी श्रीचरणी । म्हणे कृपाकटाक्षे करोनी । दासाकडे पहावे ॥१६॥
स्वामीचरणांचा स्पर्श होता । ज्ञानी झाला तो तत्त्वता । कर जोडोनिया स्तविता । झाला बहुत प्रकारे ॥१७॥
सकल ब्रह्मांडनायका । कृपाघना भक्तपालका । पाप, ताप आणि दैन्य हारका । विश्वपते जगद़्गुरु ॥१८॥
पाहुनिया प्रेमळ भक्ती । अंतरी संतोषले यति । वरदस्त ठेविती । तत्काळ मस्तकी तयाचे ॥१९॥
बसप्पाचे चरणी । मन जडले तैपासोनी । राहू लागला निशिदिनी । स्वामीसन्निध आनंदे ॥२०॥
जिकडे जातील समर्थ । तिकडे आपणही जात । ऐसे पाहुनी हासत । कुटिल जन तयाते ॥२१॥
वेड्याच्या नादी लागला । संसार याने सोडिला । घरदार विसरला । वेडा झाला निश्चये ॥२२॥
मग बसाप्पाची कांता । ऐकूनिया ऐशी वार्ता । करीतसे आकांता । म्हणे घर बुडाले ॥२३॥
आधीच आम्ही निर्धन । परी मोलमजुरी करोन । करीत होतो उपजीवन । आता काय करावे ॥२४॥
बसप्पा येता गृहासी । दुष्टोत्तरे बोले त्यासी । म्हणे सोडिले संसारासी । वेड काय लागले ॥२५॥
परी बसप्पाचे चित्त । स्वामींचरणी आसक्त । जनापवादा न भीत । नसे चाड कोणाची ॥२६॥
ऐसे लोटले काही दिन । काय झाले वर्तमान । ते होवोनी सावधान । चित्त देऊनी ऐकावे ॥२७॥
एके दिवशी अरण्यात । बसप्पा स्वामीसेवा करीत । तव झाली असे रात । घोर तम दाटले ॥२८॥
चित्त जडले श्रींचरणी । भीती नसे काही मनी । दोन प्रहर होता रजनी । समर्थ उठोनी चालले ॥२९॥
पुढे जाता समर्थ । बसप्पा मागे चालत । प्रवेशले घोर अरण्यात । क्रूर श्वापदे ओरडती ॥३०॥
आधीच रात्र अंधारी । वृक्ष दाटले नाना परी । मार्ग न दिसे त्या माझारी । चरणी रुतती कंटक ॥३१॥
परी बसप्पाचे चित्ती । न वाटे काही भीती । स्वामीचरणी जडली वृत्ती । देहभान नसेची ॥३२॥
तो समर्थे केले नवल । प्रगट झाले असंख्य व्याल । भूभाग व्यापिला सकळ । तेजे अग्नीसमान ॥३३॥
पादस्पर्श सर्पा झाला । बसप्पा भानावरी आला । अपरिमित देखिला । सर्पसमूह चोहीकडे ॥३४॥
वृक्षशाखा अवलोकित । तो सर्पमय दिसत । मागे पुढे पहात । तो दिसत सर्पमय ॥३५॥
पाहोनिया ऐशी परी । भयभीत झाला अंतरी । तो तयासी मधुरोत्तरी । समर्थ काय बोलले ॥३६॥
भिऊ नको या समयी । जितुके पाहिजे तितुके घेई । न करी अनुमान काही । दैव तुझे उदेले ॥३७॥
ऐसे बोलता समर्थ । बसप्पा भय सोडूनि त्वरीत । करी घेवोनी अंगवस्त्र । टाकीत एका सर्पावरी ॥३८॥
गुंडाळोनी सर्पा त्वरित । सत्वर उचलोनी घेत । तव सर्प झाले गुप्त । तेजही नष्ट जाहले ॥३९॥
तेथोनिया निघाले । सत्वर ग्रामामाजी आले । बसप्पासहित बैसले । समर्थ एका देऊळी ॥४०॥
तेथे आपुले अंगवस्त्र । बसप्पा सोडोनी पहात । तव त्यात सुवर्ण दिसत । सर्प गुप्त झाला ॥४१॥
ऐसे नवल देखोनी । चकित झाला अंतःकरणी । माथा ठेवी स्वामींचरणी । प्रेमाश्रू नयनी वहाती ॥४२॥
त्यासी बोलती यतीश्वर । घरी जाव त्या सत्वर । सुखे करावा संसार । दारा पुत्रा पोशिजे ॥४३॥
आनंदोनी मानसी । बसप्पा गेला गृहासी । वर्तमान सांगता कांतेसी । तेहि अंतरी सुखावे ॥४४॥
कृपा होता समर्थांची । वार्ता नुरेची दैन्याची । याविषयी ही बसाप्पाची । गोष्ट साक्ष देतसे ॥४५॥
असा तो बसाप्पा भक्त । संसारसुख उपभोगीत । रात्रंदिन ‘श्री स्वामी समर्थ’ । मंत्र जपे अत्यादरे ॥४६॥
पाप, ताप आणि दैन्य । ज्यांचे दर्शने निरसोन । जाय ते पद रात्रंदिन । प्रेमे विष्णू शंकर ध्याती ॥४७॥
पुढे कथा सुंदर । स्वामीसुताचे चरित्र । मन करोनिया स्थिर । सादर होऊनी ऐकावे ॥४८॥
इति श्री स्वामी चरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक परिसोत । पंचदशोऽध्याय गोड हा ॥४९॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


मित्रोंनो तुम्हाला Swami Charitra Saramrut Adhyay 15 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख त्वरितच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here