ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा | Swami Charitra Saramrut Adhyay 19 हा online वाचायला मिळेल.
Swami Charitra Saramrut Adhyay 19 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा
। श्री स्वामी चरित्र सारामृत एकोनविंशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥
एकाग्रचित्ते करिता श्रवण । तेणे होय दिव्य ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन । पंथ सुलभ होतसे ॥१॥
सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२॥
या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥
ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥
बोलणे असो हे आता । वर्णू पुढे स्वामीचरिता । अत्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥
प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥
कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योगाभ्यासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥
करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करिती गुरुचा ॥८॥
जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥
एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥
एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यानस्थ बैसले ॥११॥
एक आश्रमी राहोन । शिष्या सांगती गुह्यज्ञान । एक करिती तीर्थाटन । एक पूजनी बैसले ॥१२॥
ऐसे असंख्य देखिले । ज्ञान तयांचे पाहिले । कित्येकांचे चरण धरिले । परि गेले व्यर्थची ॥१३॥
हठयोग परम कठीण । कैसा करावा साध्य आपण । याविषयी पूर्ण ज्ञान । कोणी तयाते सांगेना ॥१४॥
एके समयी अक्कलकोटी । स्वामीदर्शनेच्छा धरूनी पोटी । आले नृसिंहसरस्वती । महिमा श्रींचा ऐकोनी ॥१५॥
नृसिंहसरस्वती दर्शनासी । येती कळले समर्थांसी । जाणिले त्यांच्या हृद़्गता । अंतरामाजी आधीच ॥१६॥
सन्मुख पाहोनी तयांना । आज्ञाचक्र भेदांतला । एक श्लोक सत्वर म्हटला । श्रवणी पडला तयांच्या ॥१७॥
श्लोक ऐकता तेथेचि । समाधी लागली साची । स्मृति न राहिली देहाची । ब्रह्मरंध्री प्राणवायू ॥१८॥
आश्चर्य करिती सकळ । असो झालिया काही वेळ । समाधी उतरता तत्काळ । नृसिंहसरस्वती धावले ॥१९॥
स्वामी पदांबुजांवरी । मस्तक ठेविले झडकरी । सद़्गदित झाले अंतरी । हर्ष पोटी न समावे ॥२०॥
उठोनिया करिती स्तुती । धन्य धन्य हे यतिमूर्ती । केवळ परमेश्वर असती । रुप घेती मानवाचे ॥२१॥
मी आज कित्येक दिवस । हठयोगसाधन करायास । केले बहुत सायास । परी सर्व व्यर्थ गेले ॥२२॥
स्वामीकृपा आज झाली । तेणे माझी इच्छा पुरली । चिंता सकल दुर झाली । कार्यभाग साधला ॥२३॥
असो नृसिंहसरस्वती । आळंदी क्षेत्री परतोनी येती । तेथेचि वास्तव्य करिती । सिद्धी प्रसन्न जयांना ॥२४॥
बहुत धर्मकृत्ये केली । दूरदूर किर्ती गेली । एकेदिवशी काहीवेळी । अक्कलकोटी पातले ॥२५॥
घेतले समर्थांचे दर्शन । उभे राहिले कर जोडोन । झाले बहुत समाधान । गुरुमुर्ति पाहोनिया ॥२६॥
पाहोनी नृसिंहसरस्वतीसी । समर्थ बोलले त्या समयासी । लोकी धन्यता पावलासी । वारयोषिता पाळोनी ॥२७॥
तियेसी द्यावे सोडोनी । तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी । मग सहजचि सुरभुवनी । अंती जासी सुखाने ॥२८॥
ऐकोनी समर्थांची वाणी । आश्चर्य वाटले सकला मनी । नृसिंहसरस्वती स्वामी असोनी । विपरीत केवी करतील ॥२९॥
परी अंतरीची खूण । यति तत्काळ जाणोन । पाहो लागले अधोवदन । शब्द एक ना बोलवे ॥३०॥
सिद्धी करोनी प्रसन्न । वाढविले आपुले महिमान । तेचि वारयोषितेसमान । अर्थ स्वामीवचनाचा ॥३१॥
असो तेव्हापासोनि । सिद्धी दिधली सोडोनी । येवोनी राहिले स्वस्थानी । धर्मकृत्ये बहु केली ॥३२॥
यशवंतराव भोसेकर । नामे देव मामलेदार । त्यासीही ज्ञान साचार । समर्थ कृपेने जाहले ॥३३॥
ऐसे सच्छिष्य अनेक । श्रीकृपेने ज्ञानी विशेष । ज्यांनी ओळखिले आत्मस्वरुप । महिमा त्यांचा न वर्णवे ॥३४॥
वासुदेव फडके ब्राह्मण थोर । ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र । इंग्रजी अंमलात अनिवार । होऊनी बंड केले ज्यांनी ॥३५॥
समर्थांची कृपा होता । इच्छित कार्य साधेल तत्त्वता । ऐसे वाटले त्याचे चित्ता । दर्शनाते पातला ॥३६॥
करी नग्न तलवार । घेवोन आला श्रींसमोर । घालोन साष्टांग नमस्कार । मनामाजी प्रार्थीत ॥३७॥
स्वकार्य चिंतोनी अंतरी । खड्ग दिधले श्रींच्या करी । म्हणे मजवरी कृपा जरी । तरी खड्ग हाती देतील ॥३८॥
जावोनी बैसला दूर । श्रींनी जाणिले अंतर । त्यांचे पाहोनि कर्म घोर । राजद्रोह मानसी ॥३९॥
लगबगे उठली स्वारी । सत्वर आली बाहेरी । तरवडाचे झाडावरी । तलवार दिली टाकोनी ॥४०॥
वासुदेवराव पाहोनी । खिन्न झाला अंतःकरणी । समर्थांते आपुली करणी । नावडे सर्वथा म्हणतसे ॥४१॥
कार्य आपण योजिले । ते शेवटा न जाय भले । ऐसे समर्थे दर्शविले । म्हणूनी न दिले खड्ग करी ॥४२॥
परी तो अभिमानी पुरुष । खड्ग घेवोनि तैसेच । आला परत स्वस्थानास । झेंडा उभारिला बंडाचा ॥४३॥
त्यात त्यासी यश न आले । सर्व हेतू निष्फळ झाले । शेवटी पारिपत्य भोगले । कष्ट गेले व्यर्थचि ॥४४॥
असो स्वामींचे भक्त । तात्या भोसले विख्यात । राहती अक्कलकोटात । राजाश्रित सरदार ॥४५॥
काही कारण जहाले । संसारी मन विटले । मग प्रपंचाते सोडिले । भक्त झाले स्वामींचे ॥४६॥
मायापाश तोडोनी । दृढ झाले स्वामीचरणी । भजन पूजन निशीदिनी । करिताती आनंदे ॥४७॥
अकस्मात एके दिवशी । भयभीत झाले मानसी । यमदूत दिसती दृष्टीसी । मृत्यूसमय पातला ॥४८॥
पाहोनिया विपरीत परी । श्रीचरण धरिले झडकरी । उभा राहिला काळ दूरी । नवलपरी जाहले ॥४९॥
दीन वदन होवोनी । दृढ घातली मिठी चरणी । तात्या करिती विनवणी । मरण माझे चुकवावे ॥५०॥
ते पाहोनी श्रीसमर्थ । कृतान्तासी काय सांगत । हा असे माझा भक्त । आयुष्य याचे न सरले ॥५१॥
पैल तो वृषभ दिसत । त्याचा आज असे अंत । त्यासी न्यावे त्वा त्वरित । स्पर्श याते करु नको ॥५२॥
ऐसे समर्थ बोलले । तोची नवल वर्तले । तत्काळ वृषभाचे प्राण गेले । धरणी पडले कलेवर ॥५३॥
जन पाहोनी आश्चर्य करिती । धन्यता थोर वर्णिताती । बैलाप्रती दिधली मुक्ती । मरण चुकले तात्यांचे ॥५४॥
ऐशा लीला असंख्य । वर्णू जाता वाढेल ग्रंथ । हे स्वामीचरित्र सारामृत । चरित्रसारमात्र येथे ॥५५॥
जयाची लीला अगम्य । ध्याती ज्याते निगमागम । सुर-नर वर्णिताती गुण । अनादिसिद्ध परमात्मा ॥५६॥
नानारुपे नटोनी । स्वेच्छे विचरे जो या जनी । भक्ता सन्मार्ग दाखवोनी । भवसागरी तारीत ॥५७॥
त्या परमात्म्याचा अवतार । श्रीस्वामी यति दिगंबर । प्रगट झाले धरणीवर । जगदुद्धाकारणे ॥५८॥
त्यांची पदसेवा निशीदिनी । करोनी तत्पर सदा भजनी । विष्णू शंकराचे मनी । हेचि वसो सदैव ॥५९॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । एकोनविंशोऽध्याय गोड हा ॥६०॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
आम्ही आशा करतो की तुम्हाला Swami Charitra Saramrut Adhyay 19 | श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.