व्यंकटेश स्तोत्र | Venkatesh Stotra in Marathi (2024 Update)

Venkatesh Stotra in Marathi
Print Friendly, PDF & Email
4.2/5 - (23 votes)

Venkatesh Stotra – व्यंकटेश स्तोत्र देविदास यांनी लिहिले आहे. हे एक अतिशय शुभ स्तोत्र आहे आणि बरेच लोक दररोज या स्तोत्राचे पठण करतात.

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Venkatesh Stotra Lyrics – श्री व्यंकटेश स्तोत्र online वाचायला मिळेल.

ह्या पोस्ट ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा पाठ online वाचता येइल.

व्यंकटेश स्तोत्र । Venkatesh Stotra Marathi

।। श्री व्यंकटेश स्तोत्र ।।

श्री गणेशाय नम: । श्री व्यंकटशाय नम: ।

ॐ नमो जी हेरंबा । सकळादि तू प्रारंभा ।
आठवूनी तुझी स्वरूपशोभा । वंदन भावे करीतसे ।।१।।

नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।
ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ।।२।।

नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरूपा तू स्वामिया ।
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणे श्रोतया सुख वाटे ।।३।।

नमन माझे संतसज्जना । आणि योगिया मुनिजना ।
सकळ श्रोतया साधुजना । नमन माझे साष्टांगी ।।४।।

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषांसी दाहक ।
तोषुनिया वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।।५।।

जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
परंज्योती प्रकाशगहना । करितो प्रार्थना श्रवण कीजे ।।६।।

जननीपरी त्वां पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटांपासुनि रक्षिले । पूर्ण दिधले प्रेमसुख ।।७।।

हे अलोलिक जरी मानावे । तरी जग हे सृजिले आघवे ।
जनक जननीपण स्वभावें । सहज आले अंगासी ।।८।।

दीननाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
प्रेम दिधले अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ।।९।।

आता परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
मज घालोनि गर्भाधाना । अलोलिक रचना दाखविली ।।१०।।

तुज न जाणता झालो कष्टी । आता दृढ तुझे पायी घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटी घाली माझे ।।११।।

माझिया अपराधांच्या राशी । भेदोनी गेल्या गगनासी ।
दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करी ।।१२।।

पुत्राचे सहस्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद ।
तेवी तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ।।१३।।

उडदांमाजी काळेगोरे । काय निवडावे निवडणारे ।
कुचलिया वृक्षांची फळे । मधुर कोठोनी असतील ।।१४।।

अराटीलागी मृदुता । कोठोनी असेल कृपावंता ।
पाषाणासी गुल्मलता । कैशियापरी फुटतील ।।१५।।

आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरी पडिलो पाही ।
आता रक्षण नाना उपायी । करणे तुज उचित ।।१६।।

समर्थांचे घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
तैसा तुझा म्हणवितो दीन । हा अपमान कवणाचा ।।१७।।

लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ।।१८।।

कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारी ।
यात पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पै आला ।।१९।।

द्रौपदीसी वस्त्रे अनंता । देत होतासी भाग्यवंता ।
आम्हांलागी कृपणता । कोठोनी आणिली गोविंदा ।।२०।।

मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविली मध्यराती ।
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रे ।।२१।।

अन्नासाठी दाही दिशा । आम्हां फिरविसी जगदीशा ।
कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैशी तुज न ये ।।२२।।

अंगीकारी या शिरोमणि । तुज प्रार्थितो मधुर वचनी ।
अंगीकार केलिया झणी । मज हातींचे न सोडावे ।।२३।।

समुद्रे अंगीकारीला वडवानळ । तेणे अंतरी होतसे विहवळ ।
ऐसे असोनी सर्वकाळ । अंतरी साठविला तयाने ।।२४।।

कूर्मे पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडीला नाही बडिवार ।
एवढा ब्रम्हांडगोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ।।२५।।

शंकरे धरिले हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा ।
परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा ।।२६।।

माझ्या अपराधांच्या परी । वर्णिता शिणली वैखरी ।
दृष्ट पतीत दुराचारी । अधमाहुनि अधम ।।२७।।

विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसी ।
सदा सर्वकाळ सज्जनांशी । द्रोह करी सर्वदा ।।२८।।

वचनोक्ति नाही मधुर । अत्यंत जनांसी निष्ठुर ।
सकळ पामरांमाजी पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे ।।२९।।

काम क्रोध मद मत्सर । हे शरीर त्यांचे बिढार ।
कामकल्पनेसी थार । दृढ येथे केला असे ।।३०।।

अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी ।
माझे अवगुण लिहिता धरणी । तरी लिहिले न जाती ।।३१।।

ऐसा पतित मी खरा । परी तू पतितपावन शारद्गधरा ।
तुवा अंगीकार केलिया गदाधरा । कोण दोषगुण गणील ।।३२।।

नीच रतली रायाशी । तिसी कोण म्हणेल दासी ।
लोह लागता परिसासी । पूर्वास्थिती मग कैंची ।।३३।।

गावीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळता गंगाजळ ।
कागविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निद्य कोण म्हणे ।।३४।।

तसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ ।
कन्या देऊनिया कुळ । मग काय विचारावे ।।३५।।

जाणत असता अपराधी नर । तरी का केला अंगीकार ।
अंगीकारावरी अव्हेर । समर्थे न केला पाहिजे ।।३६।।

धाव पाव रें गोविंदा । हाती घेवोनिया गदा ।
करी माझ्या कर्माचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी ।।३७।।

तुझिया नामाची अपरिमित शक्ति । तेथें माझी पापे किती ।
कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवे चित्ती विचारी ।।३८।।

तुझे नाम पतितपावन । तुझे नाम कलिमलदहन ।
तुझे नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझे ।।३९।।

आता प्रार्थना ऐके कमळापती । तुझे नामी राहे माझी मती ।
हेचि मागतो पुढतपुढती । परंज्योती व्यंकटेशा ।।४०।।

तू अनंत तुझी अनंत नामे । तयांमाजी अति सुगमे ।
ती मी अल्पमति प्रेमे । स्मरूनी प्रार्थना करीतसे ।।४१।।

श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युमन्ना अनंता केशवा ।
संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्ते ।।४२।।

पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा ।
आदिअनादि विश्वंभरा । जगदुद्धारा जगदीशा ।।४३।।

कृष्णा विष्णो हृषीकेशा । अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा ।
नृसिंह वामन भार्गवेशा । बौद्ध कलंकी निजमूर्ती ।।४४।।

अनाथरक्षका आदिपुरुषा । पूर्णब्रम्ह सनातन निर्दोषा ।
सकळ मंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ते ।।४५।।

गुणातीता गुणज्ञा । निजबोधरूपा निमग्ना ।
शुद्ध सात्विका सुज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्वरा ।।४६।।

श्रीनिधीश्रीवत्सलांछन धरा । भयकृद्भयनाशना गिरीधरा ।
दृष्टदैत्यसंहारकरा । वीर सुखकरा तू एक ।।४७।।

निखिल निरंजन निर्विकारा । विवेकखाणी- वैरागरा ।
मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमुर्ते ।।४८।।

शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा ।
गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावे ।।४९।।

नानानाटक सूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या ।
कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ति ।।५०।।

शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा ।
भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हां ये समयी ।।५१।।

ऐसी प्रार्थना करुनी देवीदास । अंतरी आठविला श्रीव्यंकटेश ।
स्मरता हृदयी प्रकटला ईश । त्या सुखासी पार नाही ।।५२।।

हृदयी आविर्भवली मूर्ति । त्या सुखाची अलोलिक स्थिती ।
आपुले आपण श्रीपती । वाचेहाती वदवीतसे ।।५३।।

ते स्वरूप अत्यंत सुंदर । श्रोती श्रवण कीजे सादर ।
सावळी तनु सुकुमार । कुंकुमाकार पादपद्मे ।।५४।।

सुरेख सरळ अंगोळिका । नखे जैसी चंद्ररेखा ।
घोटीव सुनीळ अपूर्व देखा । इंद्रनिळाचियेपरी ।।५५।।

चरणी वाळे घागरिया । वाकी वरत्या गुजरिया ।
सरळ सुंदर पोटरिया । कर्दळीस्तंभाचियेपरी ।।५६।।

गुडघे मांडिया जानुस्थळ । कटितटि किंकिणी विशाळ ।
खालते विश्वंउत्पत्तिस्थळ । वरी झळाळे सोनसळा ।।५७।।

कटीवरते नाभिस्थान । जेथोनि ब्रम्हा झाला उत्पन्न ।
उदरी त्रिवळी शोभे गहन । त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ।।५८।।

वक्ष:स्थळी शोभे पदक । पाहोनी चंद्रमा अधोमुख ।
वैजयंती करी लखलख । विद्युल्लतेचियेपरी ।।५९।।

हृदयी श्रीवत्सलांछन । भूषण मिरवी श्रीभगवान ।
तयावरते कंठस्थान । जयासी मुनिजन अवलोकिती ।।६०।।

उभय बाहुदंड सरळ । नखे चंद्रापरीस तेजाळ ।
शोभती दोन्ही करकमळ । रातोत्पलाचियेपरी ।।६१।।

मनगटी विराजती कंकणे । बाहुवटी बाहुभूषणे ।
कंठी लेइली आभरणे । सूर्यकिरणे उगवली ।।६२।।

कंठावरुते मुखकमळ । हनुवटी अत्यंत सुनीळ ।
मुखचंद्रमा अति निर्मळ । भक्तस्नेहाळ गोविंदा ।।६३।।

दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती । जिव्हा जैसी लावण्यज्योती ।
अधरामृतप्राप्तीची गती । ते सुख जाणे लक्ष्मी ।।६४।।

सरळ सुंदर नासिक । जेथे पवनासी झाले सुख ।
गंडस्थळीचे तेज अधिक । लखलखीत दोन्ही भागी ।।६५।।

त्रिभुवनीचे तेज एकटवले । बरवेपण शिगेसी आले ।
दोन्ही पातयांनी धरिले । तेज नेत्र श्रीहरीचे ।।६६।।

व्यंकटा भृकुटिया सुनीळा । कर्णद्वयाची अभिनव लीळा ।
कुंडलांच्या फाकती कळा । तो सुखसोहळा अलोलिक ।।६७।।

भाळ विशाळ सुरेख । वरती शोभे कस्तूरीटिळक ।
केश कुरळ अलोलिक । मस्तकावरी शोभती ।।६८।।

मस्तकी मुकुट आणि किरीटी । सभोवती झिळमिळ्याची दाटी ।
त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ।ऐसा जगजेठी देखिला ।।६९।।

ऐसा तू देवाधिदेव । गुणातीत वासुदेव ।
माझिया भक्तिस्तव । सगुणरूप झालासी ।।७०।।

आता करू तुझी पूजा । जगज्जीवना अधोक्षजा ।
आर्ष भावार्थ हा माझा । तुज अर्पण केला असे ।।७१।।

करुनी पंचामृतस्नान । शुद्धोधक वरी घालून ।
तुज करू मंगलस्नान । पुरुषसूक्ते करुनिया ।।७२।।

वस्त्रे आणि यज्ञोपवीत । तुजलागी करू प्रीत्यर्थ ।
गंधाक्षता पुष्पे बहुत । तुजलागी समर्पू ।।७३।।

धूप दीप नैवेध्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध ।
वस्त्रे भूषणे गोमेद । पद्मरागादिकरून ।।७४।।

भक्तवत्सला गोविंदा । ही पूजा अंगीकारावी परमानंदा ।
नमस्कारुनी पादारविंदा । मग प्रदक्षिणा आरंभिली ।।७५।।

ऐसा षोडशोपचारे भगवंत । यथाविधी पूजिला हृदयात ।
मग प्रार्थना आरंभिली बहुत । वरप्रसाद मागावया ।।७६।।

जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा । जयजयाजी गुणातीत परब्रम्हा ।
जयजयाजी हृदयवासिया रामा । जगदुद्धारा जगद्गुरो ।।७७।।

जयजयाजी पंकजाक्षा । जयजयाजी कमळाधीशा ।
जयजयाजी पूर्णपरेशा । अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते ।।७८।।

जयजयाजी भक्तरक्षका । जयजयाजी वैकुंठनायका ।
जयजयाजी जगपालका । भक्तांसी सखा तू एक ।।७९।।

जयजयाजी निरंजना । जयजयाजी परात्परगहना ।
जयजयाजी शुन्यातीत निर्गुणा । परिसावी विज्ञापना एक माझी ।।८०।।

मजलागी देई ऐसा वर । जेणे घडेल परोपकार ।
हेचि मागणे साचार । वारंवार प्रार्थितसे ।।८१।।

हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दु:ख नसावे संसारी ।
पठणमात्रे चराचरी । विजयी करी जगाते ।।८२।।

लग्नार्थीयाचे व्हावे लग्न । धनार्थियासी व्हावे धन ।
पुत्रार्थियासे मनोरथ पूर्ण । पुत्र देऊनी करावे ।।८३।।

पुत्र विजयी आणि पंडित । शतायुषी भाग्यवंत ।
पितृसेवेसी अत्यंत रत । जायचे चित्त सर्वकाळ ।।८४।।

उदार आणि सर्वज्ञ । पुत्र देई भक्तांलागून ।
व्याधिष्ठांची पीडा हरण । तत्काळ कीजे गोविंदा ।।८५।।

क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । ग्रंथपठणे सरावा भोग ।
योगाभ्यासियासी योग । पठणमात्रे साधावा ।।८६।।

दरिद्री व्हावा भाग्यवंत । शत्रूचा व्हावा नि:पात ।
सभा व्हावी वश समस्त । ग्रंथपठणेकरुनिया ।।८७।।

विद्यार्थीयासी विद्या व्हावी । युद्धी शस्त्रे न लागावी ।
पठणे जगात कीर्ती व्हावी । साधु साधु म्हणोनिया ।।८८।।

अंती व्हावे मोक्षसाधन । ऐसे प्रार्थनेसी दीजे मन ।
एवढे मागती वरदान । कृपानिधे गोविंदा ।।८९।।

प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधले वरदान ।
ग्रंथाक्षरी माझे वचन । यथार्थ जाण निश्चयेसी ।।९०।।

ग्रंथी धरोनी विश्वास । पठण करील रात्रंदिवस ।
त्यालागी मी जगदीश । क्षण एक न विसंबे ।।९१।।

इच्छा धरुनी करील पठण । त्याचे सांगतो मी प्रमाण ।
सर्व कामनेसी साधन । पठण एक मंडळ ।।९२।।

पुत्रार्थियाने तीन मास । धनार्थियाने एकवीस दिवस ।
कन्यार्थियाने षण्मास । ग्रंथ आदरे वाचवा ।।९३।।

क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । इत्यादि साधने प्रयोग ।
त्यासी एक मंडळ सांग । पठणे करुनी कार्यसिद्धी ।।९४।।

हे वाक्य माझे नेमस्त । ऐसे बोलिला श्रीभगवंत ।
साच न मानी जयाचे चित्त । त्यासी अध:पात सत्य होय ।।९५।।

विश्वास धरील ग्रंथपठणी । त्यासी कृपा करील चक्रपाणी ।
वर दिधला कृपा करूनि । अनुभवे कळो येईल ।।९६।।

गजेंद्राचिया आकांतासी । कैसा पावला हृषीकेशी ।
प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनि प्रकटला ।।९७।।

वज्रासाठी गोविंदा । गोवर्धन परमानंदा ।
उचलोनिया स्वानंदकंदा । सुखी केलें तये वेळी ।।९८।।

वत्साचेपरी भक्तांसी । मोहे पान्हावे धेनु जैसी ।
मातेच्या स्नेहतुलनेसी । त्याचपरी घडलेसे ।।९९।।

ऐसा तू माझा दातार । भक्तासी घालिसी कृपेची पाखर ।
हा तयाचा निर्धार । अनाथनाथ नाम तुझे ।।१००।।

श्री चैतन्यकृपा अलोकिक । संतोषोनी वैकुंठनायक ।
वर दिधला अलोकिक । जेणे सुख सकळांसी ।।१०१।।

हा ग्रंथ लिहिता गोविंद । या वचनी न धरावा भेद ।
हृदयी वसे परमानंद । अनुभवसिद्ध सकळांसी ।।१०२।।

या ग्रंथीचा इतिहास । भावे बोलिला विष्णुदास ।
आणिक न लागती सायास । पठणमात्रे कार्यसिद्धी ।।१०३।।

पार्वतीस उपदेशी कैलासनायक । पूर्णानंद प्रेमसुख ।
त्याचा पार न जाणती ब्रम्हादिक । मुनि सुरवर विस्मित ।।१०४।।

प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी । त्रैलोक्य भजत त्रिकाळी ।
ध्याती योगी आणि चंद्रमौळी । शेषाद्रीपर्वती उभा असे ।।१०५।।

देवीदास विनवी श्रोतया चतुरा । प्रार्थनाशतक पठण करा ।
जावया मोक्षाचिया मंदिरा । काही न लागती सायास ।।१०६।।

एकाग्रचित्ते एकांती । अनुष्ठान कीजे मध्यराती ।
बैसोनिया स्वस्थचित्ती । प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल ।।१०७।।

तेथें देहभावासी नुरे ठाव । अवघा चतुर्भुज देव ।
त्याचे चरणी ठेवोनि भाव । वरप्रसाद मागावा ।।१०८।।

इति श्री देवी दास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रं संपूर्णम ।
।। श्री व्यंकटेशार्पणमस्तु ।।


श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो. त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात. त्यांच्या जीवनातून दु:ख, संकटे निघून जातात.

आम्ही आशा करतो की तुम्हाला Venkatesh Stotra – व्यंकटेश स्तोत्र आवडला असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर खाली comment करून विचारू शकता.

3 COMMENTS

  1. राजेधिरजसिंह मोहितेहंबीरराव (ममदाबाद-पिंपळगाव)जालना

    मुर्ती प्रकट झाल्यावर भगवंताला काय मागावे🙏

  2. दिवसातून दोन वेळा वाचले तर. आणि रात्री बारा la नाही वाचले तर चालेल का…

  3. Venkatesh stotra vachnyachi correct paddhat kay aahe? I mean hya stotracha path karnyachi vidhi kay aahe, path kadhi karava, kiti vela karava ani kiti diwas karava.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here