श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2 online वाचायला प्रस्तुत करत आहे.

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा

श्री गणेशाय नम: ।

ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।

चिंतोपंत टोळ सोलापुरात । मामलेदार म्हणूनी काम करीत ।
कारकून त्यांचा असत । सातार्‍याचा रहिवासी ॥१॥

रजा घेऊनी घरी जात । माघारी असे परत येत।
पंढरपुरासी वाटॆत । दर्शनासी थांबला ॥२॥

ते काळी पंढपुरात । गोपाळ्बुवा महासिध्द ।
नामे एक अवधूत । राहत होते तेथवरी ॥३॥

विठ्ठल दर्शन करोन । सिध्द दर्शना जाई कारकून ।
गोपाळसिध्द त्या पाहोन । वदले पाहा काय ते ॥४॥

अहो तुमचे मामलेदार । त्यांसी कळवा समाचार ।
लिहून घ्या सविस्तर । पत्र तुमच्या साहेबांना ॥५॥

येत्या काही वर्षांत । श्री दत्तात्रेय अवधूत ।
येवोनी तुम्हा भेटत । सेवा त्यांची करा हो ॥६॥

ऐसे करिती भाकीत । पंढपुरी गोपाळसिध्द ।
कारकून येवोनी सांगत । चिंतोपंत टोळांना ॥७॥

असो स्वामी समर्थ । मंगळवेढयासी होते राहत ।
लीला करिती अनंत । लोकोध्दारा कारणे ॥८॥

नित्य राहती अरण्यात । क्कचित येती ग्रामात ।
व्दादश वर्षे मंगळवेढयात । ऐसे राहिले श्री स्वामी ॥९॥

भाग्यवंता दर्शन देत । लोक दत्तावधूत म्हणत ।
दिगंबर स्वामीही म्हणत । काही लोक तयांना ॥१०॥

बाळकृष्ण नामे सिध्द । होते मंगळवेढयासी राहत ।
नित्य जाती अरण्यात । दर्शन घ्यावया स्वामींचे ॥११॥

येता बाळकृष्ण भक्त । स्वामी कटॆवरी ठेविती हात ।
विठ्ठलरुपे दर्शन देत । आपुल्या प्रिय भक्तासी ॥१२॥

श्री स्वामी समर्थ । बाळकृष्णासी सिध्द करीत ।
अनेक लीला करीत । भक्तोध्दारा कारणे ॥१३॥

एका ब्राह्मणा घरी जात । वांझ गाय दुग्धवती करीत ।
ब्राह्मण होई विस्मित । पाहोनी लीला स्वामींची ॥१४॥

बसाप्पा तेली भक्त । दर्शना जाई अरण्यात ।
कंटक शयनी श्री समर्थ । पाहोनी विस्मित होत असे ॥१५॥

मनापासोनी भक्ती करीत । अरण्यी स्वामीसी सेवीत ।
लीला पाहे अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांच्या ॥१६॥

बसाप्पा आणि स्वामी समर्थ । फिरत असती अरण्यात ।
असंख्य सर्प दिसत । पाहोनी भक्त भीत असे ॥१७॥

स्वामी बसाप्पाते सांगत । हवे तितुके घॆ म्हणत ।
पागोटॆ सर्पावरी टाकत । एक उचलोनी घेत असे ॥१८॥

आता घरी जा म्हणती । तो जाई गृहाप्रती ।
पागोटॆ झटके खालती । सुवर्ण लगड पडत असे ॥१९॥

गेले त्याचे दारिद्रय । तो झाला श्रीमंत ।
ऐसे महात्म अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांचे ॥२०॥

बसाप्पा तेली सद‍भक्त । अक्कलकोट वारी करीत ।
कृतज्ञतेने सांगत । महिमा स्वामी समर्थांचा ॥२१॥

एक स्त्री वांझ असत । वय पासष्ट वर्षे असत ।
बसाप्पा तीते म्हणत ।सेवी स्वामी समर्थांसी ॥२२॥

नित्य घेई स्वामी दर्शन । दर्शनावीण न घे अन्न ।
होईल तुझी इच्छा पूर्ण । प्रसन्न होता श्री स्वामी ॥२३॥

ऐकोनि बसाप्पाची मात । वृध्द स्त्री व्रत घेत ।
स्वामी दर्शनासी अरण्यात । नित्य पाहा ती जातसे ॥२४॥

कधी कधी स्वामी समर्थ । वृध्द स्त्रीची परीक्षा पाहत ।
दोन दोन दिवस होती गुप्त । कोठे न मिळती तियेलागी ॥२५॥

ऐशा परीक्षा अवस्थेत । दोन दोन दिवस उपाशी राहत ।
परी न व्रत सोडीत । ऐसी निष्ठा तियेची ॥२६॥

दोन वर्षे व्रत करीत । स्वामी समर्थ प्रसन्न होत ।
शिरस वृक्ष दावीत । खा म्हणती चीक याचा ॥२७॥

स्वामी आज्ञेप्रमाण । करी चीक सेवन ।
एक वर्षात पुत्रनिधान । लाभले पाहा तियेसी ॥२८॥

बाबाजी भटाच्या विहिरीस । समर्थकृपे पाणी लागत ।
यवन भक्ता सिध्द करीत । अवलिया ख्याती होतसे ॥२९॥

मंगळवेढा अरण्यात । नदीकिनारी असती समर्थ ।
आणखी दोन महासिध्द । प्रकट तेथे जाहले ॥३०॥

तिघेही पर्वत चढत । एकमेकाश्सी बोलत ।
परी न कोणा कळत । संभाषण तया तिघांचे ॥३१॥

‘का रडतो का ’ एक म्हणे । ‘हाका का मारतो ’ दुजा म्हणे ।
‘ असे का करतो ’ तिजा म्हणे ।गूढ भाषा सिध्दांची ॥३२॥

लीला विग्रही समर्थ । मंगळवेढयाहुनी निघत ।
पंढपुरासी येत । दर्शन द्याया भक्तांना ॥३३॥

तेथूनी मोहोळासी येत । भीमा नदी वाटॆत ।
महापुरात प्रवेशत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥३४॥

महापुरात चालती समर्थ । पाणी गुढघाभर होत ।
लोक होऊनी विस्मित । अद्‍भूत प्रकार पाहताती ॥३५॥

गवे स्वामी मोहोळात । ते समय़ी होते राहत ।
स्वामी समर्थांसी सेवीत । अति भक्ती करोनिया ॥३६॥

तेथूनी स्वामी निघत । सोलापुरासी पोचत ।
दत्त दिगंबर अवधूत । दत्त मंदिरी बैसती ॥३७॥

चिंतोपंत टोळ दत्तभक्त । येती दत्त दर्शनार्थ ।
पाहूनी स्वामी समर्थ । मनी म्हाणती अवधारा ॥३८॥

हे कोणी सिध्दपुरुष दिसती । ऐसे टोळ मनी म्हणती ।
तात्काळ समर्थ उत्तर देती । तुला उचापती करीत । कशाला ॥३९॥

आम्ही असो सिध्द बुध्द । यात तुझे काय जात ।
उगाच उचापती करीत । कशासी येथे आहेस तू ॥४०॥

टोळ मनी म्हणत । हे मनकवडे असावेत ।
मनींचे सर्व जाणत ।ऐसे म्हणती मनामाजी ॥४१॥

आम्ही असू मनकवडे । अथवा असू पूर्ण वेडे ।
तुझ्या बापाचे काय जाते । म्हणोनी रागे भरताती ॥४२॥

पाहूनी जाणिले अंतर । टोळ करिती नमस्कार ।
म्हणती तू दत्त दिगंबर । समजूनी मजला आले हो ॥४३॥

पंढरपुरी गोपाळ अवधूत । ते भविष्य सांगत ।
श्री समर्थ दत्तावधूत । भेटती काही वर्षांनी ॥४४॥

ते भविष्य खरे जाहले । म्हणोनी हे चरण भेटलो ।
घरी चला ऐसे विनविले । श्री स्वामींसी तेधवा ॥४५॥

स्वामी त्याचे घरी जात । काही दिन तेथे राहत ।
परी येता मनात ।उठून कुठेही जाती ते ॥४६॥

स्वामींसी घेऊन सांगात । टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत ।
परी स्वामी होती गुप्त । कोठे गेले कळेना ॥४७॥

गुप्त होऊनी वाटॆत । हुमणाबादी प्रकटत ।
माणिकप्रभू तेथे असत । महासिध्द अवधारा ॥४८॥

आपुल्या आसनी बैसवीत । प्रभू सर्वां सांगत ।
हे असती दत्तावधूत । जगद्‍गुरु सर्व विश्वाचे ॥४९॥

हुमणाबादेहुनी निघत । अंबेजोगाईसी जात ।
योगेश्वरीसी पाहत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥५०॥

तेथेची समीप अरण्यात ।दत्तपहाड गुहा असत ।
गुहेत राहती श्री दत्त । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥५१॥

काही दिवस समाधिस्थ । तेथे राहती श्री समर्थ ।
तेथूनी चळांबे गावी येत । लीला विग्रही श्री स्वामी ॥५२॥

तेथे रामदासी मठात । स्वामी समर्थ होते राहत ।
लीला करिती अद्‍भुत । श्रोते तुम्ही अवधारा ॥५३॥

स्वामी असती निद्रिस्थ । बुवा मठासी टाळे लावीत ।
बाहेर निघोनी जात । कोंडोनिया स्वामींना ॥५४॥

काही क्षणांनंतर । तो जाई नदीवर ।
स्वामींसी पाहे तेथवर । मुलांसवे खेळताना ॥५५॥

आश्चर्य त्यासी वाटत । धावत येई मठात ।
कुलूप पाहोनी निश्चिंत ।होवोनी उघडी मठाते ॥५६॥

परी स्वामी समर्थ । झाले तेथूनी गुप्त ।
हे पाहूनी विस्मित । रामदासी होतसे ॥५७॥

ऐसे परी फिरत फिरत । प्रज्ञापुरी स्वामी येत ।
अक्कलकोट स्वामी समर्थ । म्हणोनी कीर्ती होतसे ॥५८॥

राहोनी अक्कलकोटात । तीनशे सिध्द निर्मित।
केवळ वीस वर्षांत । अगाध महिमा जयांचा ॥५९॥

कोटयावधी जना उध्दरिले । लक्षावधी चमत्कार केले ।
अद्‍भुत सामर्थ्य दाविले । महास्वामींनी तेथवरी ॥६०॥

समस्त पृथ्वीचा कागद केला । सप्त सागर शाई आणिला ।
सरस्वती बैसे लिखाणाला । तरी लीला संपेना ॥६१॥

ऐशा लीला अनंत । येथे पाहू संक्षिप्त ।
श्री समर्थ लीलामृत । अगाध जाणा आहे हो ॥६२॥

ऊँ निरंजनाय विद्‍महे । अवधूताय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात ॥६३॥

सर्व देवी देवता स्वरुपाय । महादत्त अवधूताय ।
प्रज्ञापूर निवासाय । नमन माझे तुजलागी ॥६४॥

हे चरित्र संक्षिप्त । तुझे तू निर्माण करीत ।
तव चरणी लीन होत । म्हणोनी मी सर्वदा ॥६५॥

श्री समर्थ वाड्मय मूर्ती । ऐसी होवो ग्रंथ ख्याती ।
श्रवण पठणे सन्मती ।प्राप्त होवो भक्तांना ॥६६॥

हे दत्तात्रेया गुरुवर्या । मजवरती करी तू दया ।
सद्‍भक्तासी सदया । अन्नवस्त्राते देई तू ॥६७॥

तैसेचि देई सद्‍गुण । देई सद्‍गुरु दर्शन ।
करुणामय ज्यांचे जीवन । लोकोध्दारार्थ अवतरले ॥६८॥

ऊँ दिगंबराय विद्‍महे ।अवधूताय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात ॥६९॥

असो श्री स्वामी समर्थ । येवोनी राहती प्रज्ञापुरात ।
अनेक जना उध्दरीत । नाना लीला करोनिया ॥७०॥


मित्रोंनो तुम्हाला Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख त्वरितच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here