श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7 हा online वाचायला मिळेल.

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा

श्री गणेशाय नम: ।

ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥

संतती संपत्ती आरोग्य । विद्या ज्ञान वैराग्य ।
आत्मज्ञान आणि योग । सर्वही मिळे भक्तांना ॥१॥

अंधाशी नेत्र मिळत । दरिद्री होई श्रीमंत ।
व्याधी निवारण होत । समर्थकृपे करोनिया ॥२॥

असो प्रज्ञापुरात । स्वामी समर्थ होते राहत ।
नित्य लीला करीत । उध्दाराया भक्तांसी ॥३॥

नास्तिका आस्तिक करीत । अभक्ता मार्गा लावीत ।
दृष्टा सज्जन बनवीत । ऐसा महिमा तयांचा ॥४॥

गर्विष्ठासी तडाखे देत । आणि मार्गावरी आणीत ।
अहंकार दवडूनी देवत्व । दिले कीत्येक भक्तांना ॥५॥

एक साधू किमयागार । नित्य सुवर्ण करी तयार ।
दर्शना लोक थोर थोर । नित्य जाती तयाच्या ॥६॥

आढयतेने बोले नित्य । म्हणे मी रसायन सिध्द ।
जो तांब्याचे सुवर्ण करीत । खरा सिध्द म्हणा त्यासी ॥७॥

जो किमया करु शकत । त्यासीच म्हणावे खरा नाथ ।
इतर भोंदू असत । म्हणोनी लोका सांगतसे ॥८॥

मच्छिंद्र आणि गोरक्ष । जालंदर आणि दत्त ।
सारे किमया करीत ।म्हणोनी मोठे होते ते ॥९॥

मीच एक सांप्रत । सोने निर्माण करीत ।
नाथांनंतर सिध्द । एकची पाहा मी असे ॥१०॥

ऐसे लोका सांगत । चिमलीतून सोने काढीत ।
लोक जयजयकार करीत । होते पाहा तयाचा ॥११॥

पक्कान्नांच्या पंगती उठत । अनेक त्याते मानीत ।
म्हणोनी गर्व होत । सिध्द स्वत: सी म्हणत असे ॥१२॥

घोडा गाडी वैभव । संपत्ती विपुल वैभव ।
सुखोपभोग सर्व । जवळी असती तयाच्या ॥१३॥

म्हणोनिया माजत । म्हणे मीच एक सिध्द ।
मजविण या जगात । सिध्द कोणी असेना ॥१४॥

रात्रीच्या अंधारात । गर्वाने तारे चमकत ।
सूर्योदय जव होत । पळोनिया जाती ते ॥१५॥

सिंह न दिसे जोवरी । जंबुक गर्जती अपारी ।
पाहता सिंहाते सत्वरी । पळोनिया जाती ते ॥१६॥

कोणी न भेटे सव्वाशेर । म्हणोनी गर्जे किमयागार ।
परी स्वामी ईश्वर । सारे काही जाणतसे ॥१७॥

किमयागार नाशिकात । होता पाहा तेव्हा राहत ।
लोकांसमोर वल्गना करीत । मोठा सिध्द म्हणोनिया ॥१८॥

नाशिकात बाबा घोलप । होते कपालेश्वर मंदिरात ।
वामनबुवा ब्रह्मनिष्ठा । येती दर्शना तयांच्या ॥१९॥

बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठा । उभयता असती बोलत ।
विषय किमयागाराचा निघत । कैसा गर्विष्ठ तो असे ॥२०॥

जावे पाहावे तयास । ऐसे वाटे मनास ।
म्हणूनी निघाले दर्शनास । त्याच वेळी तेधवा ॥२१॥

बाबा आणि वामन । तैसेची काही भक्तजन ।
जावोनी घेती दर्शन । किमयागार साधूचे ॥२२॥

साधू म्हणे तयालागोन । आम्ही तयार करितो सोने ।
आम्हासम बलवान । नाही पाहा कोणीही ॥२३॥

मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त । हेही होते किमया करीत ।
ज्यासी किमया न येत । साधू त्यासी म्हणो नये ॥२४॥

तव वामन ब्रह्मनिष्ठ । तया किमयागारासी म्हणत ।
तुमचे बोलणे समजत । नाही पाहा आम्हासी ॥२५॥

वैराग्य आणि ज्ञान । शांती आणि समाधान ।
हे साधूचे लक्षण । ऐसे आम्हा वाटते ॥२६॥

ऐसे ऐकता वचन । साधू जाई खवळोन ।
म्हणे तुमचा गुरु कोण । काय नाव तयाचे हो॥२७॥

वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत । अक्कलकोटचे स्वामी समर्थ ।
तेची आमुची गुरु असत । ऐसे म्हणती तयांना ॥२८॥

समर्थ नाव ऐकोन । साधू जाई खवळोन ।
समर्थांसी दूषण । देवोनी भक्ता पुसत असे ॥२९॥

हे कैसे स्वामी समर्थ । ते का नाही किमया करत ।
जरी ते सोने निर्मित । तरीच आम्ही मानू तया ॥३०॥

तव म्हणती समर्थ भक्त । ते नाही किमया करत ।
परी त्यांची कृपा होत । जग सुवर्ण दिसत असे ॥३१॥

ते सर्पाचे सोने करीत । हाडांचेही सोने करीत ।
मातीचे सोने करीत । ऐसा महिमा तयांचा ॥३२॥

ऐकोनी ऐसे वचन । साधू विस्मित होवोन ।
म्हणे तुमचे भाषण । सत्य का मी मानावे ॥३३॥

जरी ते समर्थ असत । मज चमत्कार दावीत ।
तेव्हाच तुमचे सत्य । मानेन जाणा निर्धार ॥३४॥

ना तरी या दुनियेत । किती तरी ढोंगी असत ।
आणि त्यांचेही भक्त । प्रचार करिती तयांचा ॥३५॥

ऐसे म्हणोनी किमयागार । देई समर्थ भक्ता उत्तर ।
असो तेथूनी सर्व । परतले आपुल्या स्थानासी ॥३६॥

आपुले स्थानी परतोन । सर्व एकत्र बैसोन ।
स्वामी समर्था लागोन । प्रार्थना करिती सर्वही ॥३७॥

हे अवधूता दत्ता । सच्चिदानंद स्वामी समर्था ।
दावी आपुली सत्ता । तया किमयागारासी ॥३८॥

ऐसे सर्वही प्रार्थून । झाले पाहा निद्राधीन ।
इकडे काय वर्तमान । घडले पाहा काय ते ॥३९॥

प्रभातकाळी उठोन । चारी बाजूस पडदे लावून ।
किमया करण्या लागोन । साधू पाहा तो बैसला ॥४०॥

सोने न होता झाले कोळसे । पाहोनी साधूस लागले पिसे ।
म्हणे हे ऐसे कैसे । झाले मजला कळेना ॥४१॥

विचार करी मनात । निंदिले स्वामी समर्थ ।
जरी असती सिध्द । चमत्कार दावा म्हटले मी ॥४२॥

तात्काळ माणसे पाठवीत । समर्थ भक्ता पाचारीत ।
म्हणे मी अपराधी असत । सच्चा स्वामी तुमचा हो ॥४३॥

तेणे केली मज शिक्षा । गेली माझी सर्व विद्या ।
किमया न ये मज आता । सोने काही होईना ॥४४॥

ऐसे पश्चात्तापे म्हणेन । धरी वामनाचे चरण ।
म्हणे मज गुरुदर्शन । सांगा केव्हा होईल ते ॥४५॥

आता होईल जव दर्शन । तेव्हा अन्नग्रहण करेन ।
ऐसे म्हणोनी प्रयाण । अक्कलकोटासी तो करे ॥४६॥

प्रज्ञापुरी येऊन । घेई स्वामी दर्शन ।
‘माजलास का रे ’म्हणोन । स्वामी पुसती तयालागी ॥४७॥

काय झाले किमयेचे । कोळसे झाले सोन्याचे ।
चमत्कार कसले पाहायचे । ऐसे म्हणती तयाला ॥४८॥

‘ क्या देखता है इधर ’ । ‘ देख रे देख उधर ’ ।
ऐसे ऐकोनी उद्‍गार । साधू पाहो लागला ॥४९॥

कडुनिंबाच्या वृक्षातून । पाणी वाहे सुवर्णवर्ण ।
तैसेची वृक्ष संपूर्ण । सुवर्णाचा दिसत असे ॥५०॥

पाणी पडे जमिनीवर । ती भूमी होई सुवर्ण ।
साधू होई कंपायमान । पाहोनी लीला स्वामींची ॥५१॥

ऐसे होता अकस्मात । समाधी त्यासी लागत ।
समाधी माजी पाहत । हिरण्यगर्भ श्री स्वामी ॥५२॥

संपूर्ण विश्व हिरण्यमय । स्वामी समर्थ हिरण्यमय ।
हे विश्व सर्व चिन्मय । ऐसे ज्ञान होत असे ॥५३॥

चार तासांनंतर । पुन्हा येई भानावर ।
करी साष्टांग नमस्कार । समर्थांसी तेधवा ॥५४॥

म्हणे मी अज्ञान । पडलो मायेत गुंतोन ।
परी तू गुरु दयाळ पूर्ण । ओढोनी माते काढिले ॥५५॥

काही सेवा न करता । उध्दार केला माझा आता ।
ऐसे करुणाकर्ता । समर्थ एकची आपण हो ॥५६॥

काही सेवा नाही केली । निंदा परी बहु केली ।
दूषणे आपणा दिली । तरी माते उध्दरिले ॥५७॥

न कळे ही काय करुणा । कैसे आपण दयाघना ।
ऐसे म्हणोनी चरणा । घट्ट साधू धरीतसे ॥५८॥

दत्तगुरु स्वामी समर्था । पूर्ण परब्रह्म अवधूता ।
काय वर्णू तुझी सत्ता । धन्य माते उध्दरिले ॥५९॥

ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत । परमानंदे डोले चित्त ।
निंदकासीही उध्दरीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६०॥

सद्य: सिध्द समागमा । ऐसा वेद वर्णे महिमा ।
दत्तगुरु तू निष्कामा । उध्दरीले आज मजलागी ॥६१॥

नाही काही सेवा केली । निंदा मात्र बहू केली ।
परी तू दयाळ माऊली । उध्दार माझा केला तू ॥६२॥

हे दत्तगुरु स्वामी समर्था । सांगा आज्ञा काय आता ।
यापुढे प्रतिक्षण चित्ता । राहो ध्यान चरणांचे ॥६३॥

ऐसे ऐकोनी नम्र वचन । स्वामी समर्थ दयाघन ।
बोलले जे गंभीर वचन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६४॥

माहूरगडी जावोनी । राहा म्हणती दत्तमुनी ।
मृगचर्म आणि कफनी । देती तया साधूला ॥६५॥

साधू माहूरगडा जात । तेथे दर्शन देती समर्थ ।
साधूचा उध्दार होत । स्वामी क्रृपे करोनिया ॥६६॥

निंदकाही करिती सिध्द । ऐसी कधी न ऐकली मात ।
परी स्वामी समर्थ । अगाध लीला त्यांची हो ॥६७॥

जो त्यांसी शरण गेला । त्यासी सिध्दपदी बैसविला ।
ऐसा महिमा आगळा । श्री स्वामी समर्थांचा हो ॥६८॥

निंदकासीही उध्दरीत । सद्‍भक्ता ज्ञान देत ।
मूढा विव्दान करीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६९॥

ऐसा स्वामी समर्थ । भक्ताजना उध्दरीत ।
ते सर्व जन भाग्यवंत । पाहिले ज्यांनी डोळ्याने ॥७०॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर शेयर करा.

वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here