श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या blog मध्ये श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6 प्रस्तुत करत आहे.

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा

श्री गणेशाय नम: ।

ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।

राहोनिया चराचरात । भक्तांचा उध्दार करीत ।
ऐसा श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिला ॥१॥

लीला विग्रही समर्थ । लीला करिती अनंत ।
जना सन्मार्गा लावीत । अनेक लीला करोनिया ॥२॥

रामशास्त्री नामे भक्त । होता पाहा सेवा करीत ।
अक्कलकोटी राहत । स्वामी सेवा करीत असे ॥३॥

गावातील ग्रामस्थ । निघाले कार्तिकस्वामी यात्रेस ।
तूही चल म्हणती यास । यात्रा करोनी येऊ या ॥४॥

तो म्हणे स्वामी समर्थ । तेच असती प्रत्यक्ष दत्त ।
त्यांसी सोडूनी व्यर्थ । जत्रा पाहावया का जावे ॥५॥

ऐसे म्हणोनी रामशास्त्री । राहिले स्वामी सेवेसी ।
असो कार्तिक पौर्णिमेसी । विचित्र प्रकार पाहतसे ॥६॥

समर्थांकडे असे पाहत । प्रकाश पडे अकस्मात ।
स्वामी रुप धरीत । कार्तिककुमार स्वामींचे ॥७॥

पाहोनी करी नमस्कार । रामशास्त्री वारंवार ।
म्हणे तू दत्त दिगंबर । सर्व रुपे तुझी देवा ॥८॥

माझा स्वामी समर्थ । सर्व देव राहती त्यात ।
ऐसे म्हणून लोकांप्रत । रामशास्त्री सांगतसे ॥९॥

एक गरीब भक्त । येई समर्थ दर्शनाप्रत ।
दारिद्रये गांजलो बहुत । म्हणोनी प्रार्थी स्वामींना ॥१०॥

राहिला सेवा करीत । झाडणे सारवण करीत ।
त्रिकाल नमस्कार करीत । ऐसा राहे तेथवरी ॥११॥

एके दिवशी अकस्मात । उठोनी जाती स्वामी समर्थ ।
त्यांचे पाठी हा गृहस्थ । आपणही जात असे ॥१२॥

हाडकांच्या ढिगार्‍यावर । जाऊनी बैसती दत्त दिगंबर ।
हात जोडूनी समोर । भक्त उभा राहतसे ॥१३॥

काही हाडे उचलोन । ‘ घे ’ म्हणती तया लागोन ।
भक्त प्रसाद समजोन । सारी हाडे घेत असे ॥१४॥

फडक्यात हाडे बांधून । ठेवी खांद्यावरी टाकोन ।
पुन्हा हात जोडोन पाहत । उभा राहे तेथवरी ॥१५॥

समर्थ आज्ञा करीत । ‘जा’ आपुल्या घरी म्हणत ।
घरी जावोनी पाहत । सुवर्ण झाली हाडे ती ॥१६॥

गेले त्याचे दारिद्रय । तो झाला श्रीमंत ।
ऐसा महिमा अगाध । श्री स्वामी समर्थांचा ॥१७॥

कुणा रामाचे रुपात । कुणा शिव कृष्ण दत्त रुपात ।
कुणा देवी विठ्ठल रुपात । दर्शन दिधले स्वामींनी ॥१८॥

कुणा गणेश दिसत । कुणा दुर्गा रुपात ।
कुणा हनुमान रुपात । दर्शन दिधले स्वामींना ॥१९॥

कोडॅक नामे अमेरिकेत । प्रसिध्द फोटो कंपनी असत ।
त्या कंपनीने मुंबईत । स्टुडिओ एक काढला ॥२०॥

स्टुडिओ मालक मनी म्हणत । सिध्दांचा देश भारत ।
सिध्दाचा फोटो प्रथम काढावा म्हणत । कॅमेर्‍याने आपुल्या ॥२१॥

म्हणोनी चौकशी करीत । कळे त्यांसी अक्कलकोटात ।
असती साक्षात दत्त । स्वामी समर्थ नावाने ॥२२॥

तो येई अक्कलकोटात । स्वामींचा फोटो काढीत ।
धुवोनी मग आणीत । दावी फोटो स्वामींना ॥२३॥

स्वामी फोटो पाहत । एका भक्तासी दावीत ।
तो भक्त म्हणे सुंदर । फोटो आहे दत्ताचा ॥२४॥

तो दुसर्‍यासी देत । त्यासी देवी दिसत ।
तिसर्‍यासी कृष्ण दिसत । त्याच फोटो माझारी ॥२५॥

कुणा राम कुणा कृष्ण । कुणा देवी कुणा दत्त ।
कुणा विठोबा दुर्गा दिसत ।एकाच फोटो माझारी ॥२६॥

फोटोग्राफर चिडत । हा तमाशा काय म्हणत ।
फोटो काढूनी घेत । हातातूनी तो भक्तांच्या ॥२७॥

पुन्हा फोटो समर्थांसी देत । समर्थं फोटो त्यासी दावीत ।
‘मी असा आहे का ’ पुसत । फोटो दावूनी तयालागी ॥२८॥

फोटोत दिसे माकड । पाहोनी सर्व दिग्‍मूढ ।
म्हणती ही अवघड । लीला स्वामी समर्थांची ॥२९॥

ऐशा लीला करीत । भक्ता सन्मार्गी लावीत ।
श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिले ॥३०॥

तयांच्या लीला अनंत । येथे पाहतो संक्षिप्त ।
श्री गुरुचरित्र अनंत । कोणी कैसे वर्णावे ॥३१॥

हाडाचे सोने करीत । सर्पाचे सोने करीत ।
भक्त इच्छा पुरवीत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥३२॥

भक्तकामकल्पद्रुम । ऐसे ज्याचे महिमान ।
तो दत्त दयाळू पूर्ण । अक्कलकोटी राहिला ॥३३॥

हाडाच्या ढिगार्‍यावर स्वामी बसलेले आहेत
व एका भक्ताला हाडे देत आहेत.

घराबाहेर दरवाज्यात बायको उभी आहे
आणि भक्त हाडे दाखवत आहेत,ती सर्व हाडे सोन्याची झाली आहेत.

रामानंद बीडकर । समर्थांचे शिष्य थोर ।
तयांसी दत्त साक्षात्कार । समर्थकृपे होत असे ॥३४॥

सिध्द तयांसी करीत । करी लोककल्याण म्हणत ।
नर्मदाकिनारी देत । दर्शन रामानंदासी ॥३५॥

स्वामी भक्त बाळाप्पा । स्वामीसुत स्वामीकुमार क्रुष्णाप्पा ।
मैंदर्गीचा सिध्दाप्पा ।ऐसे भक्त समर्थांचे ॥३६॥

गोपाळबुवा केळकर ।तैसेची सिध्द जांभेकर ।
सुरतकर बरडकर । सिध्द शिष्य समर्थांचे ॥३७॥

सच्चिदानंद स्वामीकुमार । सिध्दाबाई चेंबूरकर ।
सीताराम दिगंबर । सिध्द शिष्या समर्थांचे ॥३८॥

रामचंद्र भेंडे नामे भक्त । असे मुंबईत राहत ।
शिवभक्ती करीत । अखंड शिवासी ध्यातसे ॥३९॥

नित्य करी शिवध्यान । तेणे शिव झाले प्रसन्न ।
शिव म्हणे सावधान । सांगेन गुज तुजलागी ॥४०॥

अक्कलकोटी सांप्रत । सदेहाने मी राहत ।
तुझी वाट पाहत । आहे तेथे बैसलेले ॥४१॥

शिव आदेशानुसार । अक्कलकोटी जाई सत्वर ।
स्वामी समर्थ श्री शंकर । पाहोनी तृप्त होतसे ॥४२॥

क्षणात विष्णू रुपांत । श्री स्वामी दिसो लागत ।
पुन्हा ब्रह्म स्वरुपात । दिले दर्शन स्वामींनी ॥४३॥

प्रथम भेटीत तीण रुपांत । त्यासी स्वामी दर्शन देत ।
रामचंद्र विस्मित होत । पाहोनी रुपे समर्थांची ॥४४॥

कळवळूनी प्रार्थना करीत । निज स्वरुप दावा म्हणत ।
हासोनी स्वामी समर्थ । म्हणती ‘ लो हम आ गये ’ ॥४५॥

ऐसे म्हणोनी स्वामी समर्थ । पुन्हा निजरुप धारण करीत ।
रामचंद्र होई सिध्द । समर्थ कृपे करोनिया ॥४६॥

तात महाराज म्हणून । नंतर ते होती प्रसिध्द ।
मठ करिती मुंबईत । ऐसे कार्य समर्थांचे ॥४७॥

नृसिंह सरस्वती साधक । योगासाधना करिती बहुत ।
हठयोगा ते आचरीत । धौती बस्ती इत्यादी ॥४८॥

परी समाधी न लागत । वासुदेव मयं जगत ।
ऐसा अनुभव कोण देत । म्हणोनी चिंता करिती ते ॥४९॥

स्वामी कीर्ती ऐकोन । करिती प्रज्ञापुरि प्रयाण ।
स्वामींसी नमन करोन । क्षणभर उभे राहती ते ॥५०॥

आज्ञाचक्र भे्दन । श्लोक म्हणती गुरु आपण ।
साधक होती समाधिमग्र । अद्‍भुत लीला स्वामींची ॥५१॥

अष्टौप्रहर समाधित । स्वामी नृसिंह सरस्वती राहत ।
ऐसी लीला अद्‍भुत । श्री दत्त स्वामी समर्थांची ॥५२॥

हरिभाऊ नामे भक्त । मुंबईसी होता राहत ।
समर्थांसी नवस करीत । कर्ज आपुले फिटावे ॥५३॥

कर्ज फिटता दर्शना येत । स्वामी समर्था नमस्कारीत ।
स्वामी तयाते म्हणत । सुत व्हावे माझा तू ॥५४॥

ते मग संन्यास घेत । स्वामीसुत नाम घेत ।
मठ स्थापिती मुंबईत । लोकोध्दारा कारणे ॥५५॥

स्वामीसुतांची कीर्ती होत । हजारो लोका उध्दरीत ।
भक्तिमार्गाते लावीत । ऐसा महिमा स्वामींचा ॥५६॥

नाना पारशी नामक । होता मुंबईत राहत ।
नेत्र जाती अकस्मात । काही त्यासी दिसेना ॥५७॥

स्वामीसुतांचे दर्शनार्थ । भक्तजन त्यांसी नेत ।
डोळयांस लावीती हात । श्री स्वामीसुत तेधवा ॥५८॥

तात्काळ दिसो लागत । लोक होती चकित ।
पारशी लोक बहुत । येवो लागले दर्शना ॥५९॥

श्री स्वामी समर्थ । ईश्वर असती साक्षात ।
ऐसे पारशी भक्त । म्हणू लागले तेधवा ॥६०॥

मुंबईहून असंख्य भक्त । अक्कलकोटी येऊ लागत ।
स्वामी त्यांसी सांगत । स्वामीसुत मीच असे ॥६१॥

घ्यावे स्वामीसुतांचे दर्शन । त्या रुपे मुंबईत जाण ।
मी राहे अनमान । मनी काही आणू नका ॥६२॥

मुंबईहूनी प्रज्ञापुरात ।येता कोणी दर्शनार्थ ।
स्वामीसुतांची सेवा करीत । राहा म्हणोनी सांगती त्या ॥६३॥

जो स्वामीसुतांसी सेवीत । त्यांच्याअ मनोकामना पूर्ण होत ।
ऐसे स्वामी समर्थ । स्वये सांगती लोकांना ॥६४॥

ऐसे श्री स्वामीसुत । जव अवतार समाप्ती करीत ।
स्वामी समर्थ दु: खित । होती पाहा तेधवा ॥६५॥

गुरु आधी शिष्य गेला । बापा आधी पुत्र गेला ।
श्री स्वामीचा कळवळा । स्वामीसुतावरी ऐसा हो ॥६६॥

असो स्वामीसुतानंतर । मुंबईत राहिले स्वामीकुमार ।
स्वामी कार्य निरंतर । पुढे त्यांनी चालविले ॥६७॥

स्वामीसुतांचे अनुज । श्री स्वामींचा कीर्तिध्वज ।
मुंबईत उभारिती सहज । ऐसा महिमा तयांचा ॥६८॥

ऐसे स्वामी समर्थ । लोकोध्दारा तळमळत ।
त्यांचे चरित्र संक्षिप्त । येथे तुम्हा सांगतसे ॥६९॥

हा ग्रंथ नव्हे कल्पवृक्ष । भक्त इच्छा पुरवीत ।
श्री स्वामी समर्थ । राहे शब्दी भरोनिया ॥७०॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा, आणि ह्या पेज ला तुमच्या मित्रां बरोबर नक्की share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here